नाशिक : नारायण सुर्वे यांनी समाज प्रबोधन करुन गरिबांना साहित्यातून जगण्याचे बळ दिले. सुर्वे यांच्या विचारांचा वारसा साहित्यातून जगभर पोहचला आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, स्वागताध्यक्ष डॉ. विशाल जाधव, वाचनालयाचे अध्यक्ष उत्तम कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. विचार पुढे घेऊन जात गरिबांसाठी लेखणी वापरली पाहिजे, असे नारायण सुर्वे सांगत. सुर्वेंच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्रातील पहिला कार्यक्रम नाशिकमध्ये होत असल्याचा आनंद आहे. देश कृतीशील राहण्यासाठी लेखन करणारे डॉ. कसबे, कांबळे इथे राहतात. आणखी काय हवंय, असे शिंदे यांनी सांगितले. रस्त्यावर सापडलेले सुर्वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्याचा आपणास अधिक आनंद झाला होता. सुर्वे विचारांचा वारसा साहित्यातून घेऊन जगभर पोहोचले. कष्ट उपसत त्यांनी उदरनिर्वाह केला. पुढे मास्तर म्हणून त्यांनी नाव मिळवले. त्यांच्या विचारांवर गिरणगावचा, तिथल्या लोकांच्या जगण्याचा, कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव होता. सर्व हातात आहे, असे समजावून त्यांनी पोटतिडकीने साहित्यातून विचार मांडले, असे सुशिलकुमार शिंदे यांनी नमूद केले. वाचनालयात सुर्वे यांच्या प्रतिमेला शिंदे यांनी अभिवादन केले. ‘झेप’ या सुर्वेंच्या कवितेचे वाचनही त्यांनी केले.
डॉ. कसबे यांनी, वाचकांच्या जाणिवा बदलाव्यात, विकास व्हावा यासाठी साहित्यिकांनी एकत्र यावे म्हणून नारायण सुर्वे साहित्य संमेलन होत असल्याचे सांगितले. नारायण सुर्वेंनी साहित्य निर्मितीतून माणसांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या. मार्क्सवाद मराठीतून मांडणारे सुर्वे आणि क्रांतिकारी साहित्यिक बाबूराव बागूल हे सशक्त दुवे आहेत. सद्यस्थितीत संपूर्ण जग एका दरीच्या काठावर उभे आहे. आता भांडवलशाही आणि लोकशाही यांच्यात अंतर वाढत आहे. भांडवलशाही जिवंत राहण्यासाठी जगभरातील विचारवंत विचार करत आहेत. लोकशाही समाजवादाकडे घेऊन जाण्यासाठी निवडणुका मार्ग आहे. पण भांडवलशाही अर्थव्यवस्था टिकविण्याची खात्री नाही. भांडवलशाहीतील आंतरविरोधामुळे दुसरे महायुद्ध झाल्याचे आपण पाहिले. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांनी पर्याय सांगितला. निसर्ग आणि माणसाने एक व्हावे. प्रश्न विचारत उत्तरे शोधता येतील, असे डॉ. कसबे यांनी सांगितले.
स्वागताध्यक्ष डॉ. जाधव यांनी नाशिक आणि सुर्वे यांच्यातील स्नेहबंध उलगडत सुर्वे यांचे साहित्य, सुर्वे वाचनालय, पतसंस्था याबाबत माहिती सांगितली. वाचनालयाचे विश्वस्त राजू देसले यांनी प्रास्ताविक केले. साहित्य संमेलनाने सुर्वे यांच्या जन्मशताब्दीची सुरुवात होत असून वर्षभर कार्यक्रम होतील. या माध्यमातून सुर्वे यांचे विचार पोहचविण्याचा प्रयत्न होईल, असे सांगितले. सुर्वेंच्या जीवनपट चित्रफितीचे तल्हा शेख यांनी सादरीकरण केले. कवी रविकांत यांनी सूत्रसंचालन केले. वाचनालयाचे सचिव राजू नाईक यांनी आभार मानले.
