नाशिक : मागील काळात झालेल्या चुका दुरूस्त करण्याचे काम विरोधी पक्ष करत आहे. राहुल गांधी यांनी देशपातळीवर निवडणूकविषयक झालेल्या चुका, मतदार यादीतील घोळ यासह संपूर्ण माहिती दिली असतानाही आयोगाचे डोळे उघडत नाहीत. निवडणूक आयोग ऐकत नसेल तर आंदोलन हा एकमेव पर्याय उरतो, असे मत माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मांडले आहे.
येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशपातळीवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत घोळ झाला. मतदार याद्यांमध्ये नाव गायब, गाव गायब अशा अनेक त्रुटी असल्याची माहिती दिल्यानंतरही निवडणुक आयोग काही करत नाही. निवडणुक आयोग आयुक्तांची भेट घेत चर्चा केली आहे. यासंदर्भात कायदा केला पाहिजे, चुकीचे होत असेल तर लक्षात आणून देणे गरजेचे आहे. या परिस्थितीतून मार्ग निघत नसेल तर आंदोलन हा एकच पर्याय उरतो. यासाठी आंदोलन करावेच लागेल, असे शिंदे यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीसाठी काँग्रेस पदाधिकारी एकत्र बैठक घेतील. आणि निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. नक्षलवाद रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करत असल्याने त्यांचे अभिनंदन. मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०२६ पर्यंत नक्षलवादापासून मुक्ती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. वास्तविक हे शक्य नाही. परंतु, मुख्यमंत्री यासाठी प्रयत्न करत असतील तर शुभेच्छा. याआधीही खूप जणांनी नक्षलवादाचा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न केले. परंतु, ते शक्य झाले नाही. माओवादी आजही लढा का देतात, हे अजून समजले नाही. याच्या खोलात जाण्याची गरज आहे. गरिबांचे काम केले, त्याचे प्रश्न सोडविल्यास माओवाद संपेल असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.