नाशिक – शासकीय धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील ३८५४ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषदांना टप्पा एक ते सहामध्ये बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमु्क्त करण्याचे निर्देश दिले. त्याचे पालन करून धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, जळगाव या जिल्हा परिषदांनी संबधित शिक्षकांना कार्यमुक्त करून बदली झालेल्या ठिकाणी हजर करून घेतले आहे. केवळ नाशिक जिल्ह्यातील हजारो शिक्षक मात्र त्यास अपवाद ठरले. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या संदर्भात बदलीपीडित शिक्षकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देऊन नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत कार्यमुक्ती न दिल्याकडे लक्ष वेधले. शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया शासनाने ऑनलाईन पद्धतीने पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त व न्याय पद्धतीने पार पाडली होती. त्यानुसार जिल्ह्यात ३८५४ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.

२१ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाईन बदलीचे आदेश प्राप्त होताच शिक्षकांमध्ये आनंदाची लाट उसळली होती. परंतु, नाशिक जिल्ह्यात पावणेदोन महिने होऊनही कार्यमुक्ती न दिल्यामुळे सर्वांचा हिरमोड झाल्याचे बदलीपीडित शिक्षकांनी म्हटले आहे. वारंवार अर्ज, विनंती, निवेदने देऊनही प्रशासन टोलवाटोलवी करून कालापव्यय करीत असल्याची तक्रार शिक्षकांनी केली. संपूर्ण राज्यात दररोज जिल्हा परिषदेतील शिक्षकांची कार्यमुक्ती होत असताना शिक्षणमंत्री दादा भूुसे यांच्या नाशिक  जिल्ह्यातील शिक्षकांची मात्र फरपट होत असल्याचे समोर आले आहे.

बदलीपूर्वी राज्यात जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती बदलीनंतरही आहे. बदलीमुळे कुठेही विपरित परिणाम होत नाही. तरीदेखील चालढकल केली जात असल्याने आमची घोर निराशा झाल्याचे काहींनी म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला कार्यवाही करण्यासाठी निर्देश द्यावेत, असे साकडे बदलीपीडित शिक्षकांनी घातले. सुमारे चार हजार शिक्षकांची कार्यमुक्ती का रखडली, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या जिल्ह्यातच असे का घडले, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

जिल्हा परिषदेने कार्यमुक्ती प्रक्रिया न राबविल्यास जिल्ह्यातील बदली इच्छुक महिला शिक्षिका विभागीय आयुक्त कार्यालयासमोर १७ ऑक्टोबरपासून बेमुद्त धरणे आंदोलन करतील, असा इशारा बदली कार्यमुक्ती समितीने दिला आहे. पावणेदोन महिन्यांपासून हा विषय रखडलेला आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी संकलन परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून ही प्रक्रिया काही काळ थांबलेली होती. या परीक्षा झाल्यानंतर दिवाळीच्या आसपास शिक्षकांना कार्यमुक्त केले जाणार असल्याचे आश्वासन संबंधित शिक्षकांना देण्यात आल्याचे पवार यांनी म्हटले आहे.