Rafale vs Tejas MK-1A : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील फ्रान्स बनावटीचे बहुचर्चित राफेल आणि पावणेदोन वर्षाच्या विलंबानंतर दाखल होणारे स्वदेशी तेजस – एमके १ए या दोन्ही लढाऊ विमानांची तुलना होऊ लागली आहे. खरेतर प्रत्येक लढाऊ विमानाचे काही वैशिष्ठ्ये, कामगिरीत वेगळपण असते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक प्रकल्पात तयार झालेले पहिले तेजस – एमके १ए लढाऊ विमान आकाशात भरारी घेत असताना राफेलशी त्याची तुलना होत आहे. सिंदूर मोहिमेत राफेल बहुउद्देशीय लढाऊ विमानांची कामगिरी उजळून निघाली. फ्रेंच बनावटीचे राफेल हे ४.५ व्या पिढीतील विमान म्हणून गणले जाते. दलातील ते सर्वात प्रगत लढाऊ विमान आहे.
भारताच्या राफेलमध्ये १३ विशिष्ट सुधारणा करण्यात आल्या. आधुनिक रडार प्रणालीने सुसज्ज विमानात इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली सामाईक केली आहे. लांब पल्ल्याची आकाशातून आकाशात मारा करणारी बहुउद्देशीय क्षेपणास्त्रे तसेच पर्वतीय क्षेत्रासह कोणत्याही भूभागात भुयारांसारखी ठिकाणे नष्ट करणारे हॅमर क्षेपणास्त्र, गायडेड बॉम्ब आदी शस्त्रास्त्रे वाहून नेता येतात. सिंदूर मोहिमेत राफेलच्या माध्यमातून स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्रे आणि हॅमर बॉम्बसारख्या शस्त्रांनी अचूकतेसह प्रहार क्षमता सिद्ध केली.
स्वदेशी बनावटीचे हलके तेजस हे सुद्धा ४.५ पिढीतील विमान मानले जाते. या विमानाची पहिली आवृत्ती (एलसीए), २०१६ साली, दलात समाविष्ट करण्यात आली. तेजसमध्ये वापरली जाणारी जवळपास ७५ टक्के सामग्री स्वदेशी आहे. तेजस – एमके १ए विमानात त्याच्या पूर्ववतीच्या तुलनेत ४० सुधारणा करण्यात आल्या. यामध्ये प्रगत एव्हियोनिक्स, आधुनिक रडार यंत्रणा, शस्त्रे, हवेतून हवेत इंधन भरणे, डिजिटल काचेची कॉकपिट आदींचा अंतर्भाव आहे. लढाऊ क्षमता वाढविण्यासाठीही बदल करण्यात आले. अति उंचावरील उड्डाणात वैमानिकाला प्राणवायू देणाऱ्या (ओबीओजीएस) व्यवस्थेची क्षमताही अधिक आहे. स्वदेशी व परदेशी शस्त्रांस्त्रांसाठी एकत्रित व्यवस्था हे त्याचे वेगळेपण आहे. ‘सेल्फ प्रोपेल्ड जँमर’ विमानाच्या इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतांना बळकटी देते. एमके१ए प्रकारात विस्तरित शस्त्र सामग्री असून ज्यामध्ये दृश्यमान श्रेणीच्या पलीकडे हवेतून हवेत मारा करणाऱ्या अस्त्र क्षेपणास्त्राचा समावेश आहे.
राफेलचे शस्त्रांविना वजन १० हजार ३०० किलोतर, तेजस – एमके१एचे सहा हजार ५६० किलो आहे. तज्ज्ञांच्या मते जड वजनाच्या तुलनेत मध्यम वजनी विमानाचा उच्च उंचीच्या क्षेत्रातील मोहिमेत काही फायदे मिळतात. तेजसची शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता पाच हजार ३०० किलो आहे, जी राफेलच्या साडेनऊ हजार किलोपेक्षा कमी आहे. परंतु, बहुतेक मोहिमांसाठी ती पुरेशी मानली जाते. तेजस एमके-१एचा पल्ला तीन हजार तर राफेलचा ३७०० किलोमीटर आहे. राफेल एक सक्षम परंतु, अवलंबून राहणारा उपाय आहे. तर तेजस – एमके १ए ते अवलंबित्वच संपुष्टात आणतो.