नाशिक : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर रामकुंड परिसरात काही दिवसांपासून होत असलेल्या गोदा आरतीमुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. परंतु, या आरतीसाठी दोन गट निर्माण झाले आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने गोदाघाटावर आरतीसाठी होणाऱ्या बांधकामाला विरोध दर्शवित शनिवारी गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

रामकुंडाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असल्याने या ठिकाणी काही दिवसांपासून गोदा आरतीचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने ही आरती होत असताना रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने दररोज शासकीय गोदा आरती सुरु करण्यात आली. दोघांनी वेगवेगळी आरती करण्याऐवजी एकच आरती करण्यासंदर्भात चर्चाही झाली. परंतु, तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे दररोज सायंकाळी दोन गोदा आरत्या होत असतात. रामतीर्थ सेवा समितीतर्फे होणाऱ्या आरतीसाठी नदीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला पुरोहित संघाने कडाडून विरोध केला आहे. अशा प्रकारचे बांधकाम करू नये, अशी मागणी केली आहे. तसे झाल्यास अधिक आक्रमक पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा पुरोहित संघाने दिला आहे. शनिवारी सकाळी या ठिकाणी बांधकामाला विरोध दर्शवित गंगा गोदावरी पुरोहित संघाने ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. आंदोलना दरम्यान पोलीस आणि पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.

हेही वाचा…नाशिक : गंगापूरजवळ पुलावरुन नदीत वाहन कोसळून एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

या ठिकाणी बांधकाम करायचे असेल तर आमच्या डोक्यात येथे दगड घालावा, आम्ही हुतात्मा होण्यास तयार आहोत, अशी आक्रमक भूमिका पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी घेतली आहे.

हेही वाचा…नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी तीन लाचखोरांवर कारवाई, एक लाखाची लाच स्वीकारताना महावितरणचा अभियंता जाळ्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोदा आरतीचे काम महत्वाचे आहे. या ठिकाणी घाटाचे होणारे काम, सुशोभिकरण हे पर्यावरणपूरक आहे. परंतु, हा विषय पुरोहित संघ आणि शासन यांच्यात अडकला आहे. यासाठी विरोध व्हायला नको. – जयंत गायधनी (रामतीर्थ गोदावरी सेवा समिती)