नाशिक – शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) विधान परिषदेचे माजी सदस्य नरेंद्र दराडे यांच्या पाठोपाठ बुधवारी इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी समर्थकांसह ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश केला. यावेळी येवल्यातील दराडे समर्थक आणि इगतपुरीतील गावित समर्थक, ठाकरे गटाचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यामुळे ठाकरे गटाला जिल्ह्यात हादरे बसणे सुरुच आहेत.

दिवंगत केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांची कन्या निर्मला गावित यांनी काँग्रेसकडूनच इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. मागील निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत ही जागा महाविकास आघाडीतील जागा वाटपात ठाकरे गटाला मिळाली नाही. त्यामुळे निर्मला गावित यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये परतण्याचा विचार केला होता. परंतु, काँग्रेसने त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

ठाणे येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गावित यांनी समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रवेश करणाऱ्यांना उद्देशून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, तुमचा पक्ष बदलला नसून तुम्ही स्वगृही आले आहात. आधी तुमच्याकडे जो धनुष्यबाण होता, तोच धनुष्यबाण तुमच्या हाती असल्याचे सांगितले. आपण मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने दिलेली वचने टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचा सुपडासाफ झाल्यामुळे ते या योजनेविषयी उलटसुलट चर्चा करतात. त्यामुळे लाडक्या बहीणसह अन्य योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांना उत्तर देण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.

अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना राबविल्या गेल्या. त्यामुळे राज्याच्या इतिहासात कधी नव्हे एवढे यश महायुतीला मिळाले. यात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. घोटी पाणी पुरवठा योजना, इगतपुरी- त्र्यंबकेश्वरमधील उपसा सिंचन योजनांना सुधारीत मान्यता, धरणासाठी संपादित झालेल्या जागा शेतकऱ्यांना परत देणे, पोषण आहारबाबतच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सत्ता येते, जाते. परत येते. पद वरखाली होत असते. परंतु, नाव गेले की परत येत नाही. असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, असा दाखला देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असा दावा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम-लक्ष्मणची जोडी

येवल्यातील शिक्षक आमदार किशोर दराडे हे आधीच शिंदे गटात गेले होते. तर त्यांचे बंधू माजी आमदार नरेंद्र दराडे हे मात्र ठाकरे गटातच होते. राम आला, लक्ष्मण कुठे आहे, अशी विचारणा आपण केली असता किशोर दराडेंनी नरेंद्र दराडेंनाही आणल्याचे सांगितले. राम-लक्ष्मण अशी ही जोडी आहे. नरेंद्र दराडे यांच्या माध्यमातून लक्ष्मणही आता शिंदे गटात आल्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधले.