विरोधी पक्षात असताना भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराविरोधात वक्तव्ये केली होती, परंतु तो पक्ष सत्तेत आल्यानंतर वर्षभरातच भ्रष्टाचाराची वेगवेगळी प्रकरणे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. अशा प्रकरणांमुळे जनतेच्या विश्वासार्हतेला तडा जात नाही ना, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला खा. सुप्रिया सुळे यांनी दिला.

शनिशिंगणापूरच्या विश्वस्त मंडळात महिलांना संधी मिळाल्याचे सुळे यांनी स्वागत केले. महिलांना शनी चौथऱ्यावर प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गुरुवारी येथे आयोजित ‘आनंदींचा उत्सव’ कार्यक्रमासाठी आल्या असताना  पत्रकारांशी संवाद साधला.  विरोधी पक्षात असताना भाजप नेत्यांची विधाने वेगळीच होती. पण हा पक्ष सत्तेवर आल्यानंतर भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे येत असल्याकडे सुळे यांनी लक्ष वेधले. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येच्या चौकशीत संथपणा असून राज्य तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात असल्याचे नमूद केले.