धुळे : एखाद्या व्यक्तीला नाहक त्रास द्यायचा, लाच मिळाल्याशिवाय कामच करायचे नाही, अशी मानसिकता आजकाल अनेक अधिकाऱ्यांची झाली आहे. गडगंज पगार मिळत असतानाही इतरांच्या पैशांवर नजर ठेवणारी ही कीड अधिकाऱ्यांमध्ये पसरली आहे. असाच एक प्रकार धुळे जिल्ह्यात घडला. दहा वर्षापासून हक्काच्या निवृत्ती वेतनाच्या एक कोटी ३६ लाखांसह अर्जित रजेचे १२ लाख ९० हजार रुपये मिळावेत, यासाठी शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील माजी मुख्याध्यापकाचा छळ सुरु होता. मुख्याध्यापकांनी न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाने शिक्षणाधिकारी मनीष पवार यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांच्या समक्ष शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्यात आली.
कुरखळी येथील गुरुदत्त विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यालयातील मुख्याध्यापक विश्वास पाटील यांच्या निवृत्ती वेतनाचे आणि अर्जित रजेचे सुमारे एक कोटी ४९ लाख रुपये दहा वर्षापासून मिळालेले नाहीत. या वेतनाची फाईल शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्याकडे मंजुरीसाठी पडून आहे. वारंवार पाठपुरावा करुनही पवार हे स्वाक्षरी करीत नसल्याने पाटील यांनी याबाबत अनेकवेळा वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या. तरीही त्याचा उपयोग झाला नाही. संबंधित संस्थेनेही लक्ष दिले नाही.
अखेर मुख्याध्यापक पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली. शिक्षणाधिकारी यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. खुर्ची जप्तीच्या कारवाईसाठी गेलेल्या वकिलांसह पोलिसांना काहीकाळ दालनाबाहेर ताटकळत उभे रहावे लागले. कारण, शिक्षणाधिकारी पवार हे रजेवर गेले होते. तर ज्यांच्याकडे प्रभारी पद्भार होता, त्या महिला अधिकारीही दालनात नव्हत्या. काही वेळानंतर प्रभारी महिला शिक्षणाधिकारी आल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची खुर्ची जप्त करण्यात आली. कोणत्याही अधिकाऱ्याची खुर्ची जप्त करणे, हा त्या संबंधित अधिकाऱ्याला मोठा फटका बसतो. या कारवाईतून शिक्षणाधिकारी पवार काही बोध घेतील काय, हा खरा प्रश्न आहे.
न्याय हक्कासाठी मला न्यायालयात दाद मागावी लागली. त्याचा निकाल माझ्या बाजुने लागला. शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा केली. ते इथे नसून बाहेरगावी गेले आहेत. दहा वर्षापासून माझ्या हक्काचा एकही रुपया मला मिळालेला नाही. निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्या टेबलावर पडून आहे. त्या प्रस्तावावर न्यायालयाने आदेश देवूनही शिक्षणाधिकारी स्वाक्षरी करीत नाहीत.-विश्वास पाटील (माजी मुख्याध्यापक)