नाशिक : कढीपत्ता बाजारात अगदी कमी किंमतीत, सहज उपलब्ध होणारी गोष्ट. खाद्यपदार्थ स्वादिष्ट करणाऱ्या कढीपत्याला दिवाळीच्या तोंडावर मात्र जणू सोन्यासारखे भाव आले आहेत. आरोग्यासाठी फायदेशीर मानला जाणारा कढीपत्ता चिवड्याबरोबर इतर फरांळांच्या पदार्थांमध्ये वापरला जातो. यामुळे सध्या त्याच्या मागणीत मोठी वाढ झाली असून दरही उंचावले आहेत.

घरोघरी पदार्थाला फोडणी देताना कढीपत्त्याचा नियमित वापर केला जातो. त्याने पदार्थाला छान चव येते. पोहे, उपिटासारखे पदार्थ तर कढीपत्त्याशिवाय विचारही करता येत नाही. कढीपत्त्याशिवाय स्वयंपाकघर अनेकदा अपूर्ण मानले जाते. भारतीय पाककृतींना चव देण्यासाठी या औषधी बनस्पतीचा वापर केला जातो. कढीपत्त्याची पाने झाडापासून येतात. ती मूळची भारत. श्रीलंका आणि अनेक आग्नेय आशियाई राष्ट्रांमध्ये आढळतात.

कढीपत्ता काहीसा कडू, तुरट आणि थोडा गोड असा मिश्र चवीचा असतो. पण तो केवळ चवीपुरताच उपयोगी नसून आरोग्यासाठीही उपयुक्त मानला जातो. दिवाळीत कढीपत्त्याचा वापर वाढतो. भाजलेल्या पोह्यांच्या चिवड्यामध्ये फोडणी देताना कढीपत्ता वापरला जातो. त्यामुळे चिवड्याला चांगली चव येते. शिवाय कुरकुरीतपणा टिकवून ठेवण्यास मदत करतो. काही प्रकारच्या शेव, चकली, अन्य तळलेल्या पदार्थांमध्ये कढीपत्ता वापरला जातो.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, घरोघरी फराळ बनवण्यास सुरुवात झाली आणि कमी किंमतीत मिळणाऱ्या कढीपत्त्याचे दर दुप्पट झाल्याचे चित्र आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कढीपत्ता विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सुमन खरात यांनी या दरवाढीचे कारण सांगितले. दिवाळीमुळे मागणी वाढलेली आहे. मात्र ऑक्टोबर हिटच्या तडाख्याने झाडांवरील पाने सुकत आहेत. त्यामुळे माल कमी प्रमाणात उपलब्ध होतो. नाशिक जिल्ह्यात सुकेणेसह आसपासच्या भागात कढीपत्त्याची शेती केली जाते. अतिवृष्टीत कढीपत्त्याचे फारसे नुकसान झाले नाही. पण तळपत्या उन्हात अधिक नुकसान होत आहे.

मागील वर्षी ऐन दिवाळीत कृषी उत्पन्न बाजारात कढीपत्ता दिसेनासा झाला होता. बहुतांश ग्राहक कढीपत्ता शोधत होते. परंतु, तो मिळत नव्हता, इतकी टंचाई होती. यावेळी एकदम तशी परिस्थिती नाही. सध्या आम्हाला तो बागेतून प्रति किलो ४० रुपये दराने खरेदी करावा लागतो. त्यामुळे एरवी कढीपत्त्याची लहानशी जी जुडी किरकोळ बाजारात १० रुपयांना विकली जाते, ती २० रुपयांना विकण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे खरात यांनी सांगितले. दिवाळीतील चिवडा व अन्य फराळांत चव महत्वाची असल्याने दरवाढ होऊनही ग्राहकांना तो खरेदी करणे भाग पडले आहे.