धुळे – नोकरीचे अमिष दाखवून पोलीस मुख्यालयात वास्तव्यास असलेल्या अनेक तरुणांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध धुळ्यातील आझाद नगर पोलीस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल झाला आहे.अमोल केंद्रे (२८, रा.कुमठा खुर्द, उदगीर, जि. लातूर) हा धुळ्यातील पोलीस मुख्यालयात वास्तव्यास आहे. त्याला नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून उमेश महाजन (माळी) आणि सीमा महाजन (माळी) रा. सुभाष नगर, जुने धुळे या दाम्पत्याने सहा लाख रुपये घेतले.

२१ जानेवारी २०२३ ते १६ मार्च २०२४ या कालावधीत हा व्यवहार झाला. परंतु, नोकरी न मिळाल्याने आपण फसविले जात आहोत, हे लक्षात आल्यावर अमोलने महाजन दाम्पत्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. उमेश महाजन यांच्याकडे सहा लाख रुपये परत करण्यासंदर्भात विचारणा असता महाजन यांनी केंद्रे यांना सावकारी कायद्याखाली पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाजन दाम्पत्याने अमोल केंद्रे यांच्यासह अन्य चार जणांचीही अशीच फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>नंदुरबारमध्ये गणेश विर्सजन करताना मुलाचा बुडून मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाजन दाम्पत्याने केंद्रे यांच्या ओळखीतील आणि पोलीस मुख्यालयातच वास्तव्यास असलेले अजय मोरे यांच्याकडून अडीच लाख, लालसिंग पावरा यांच्याकडून तीन लाख ९८ हजार, अरुण भिल यांच्याकडून १२ लाख आणि आशाबाई पानपाटील यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले आहेत, असेही केंद्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून आझाद नगर पोलीस ठाण्यात महाजन दाम्पत्याविरुद्ध फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे.