नाशिक – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर पुकारलेल्या आंदोलनासाठी शुक्रवारी सकाळपासून नाशिकचे ग्रामदैवत कालिका मातेचे दर्शन घेऊन शेकडो वाहनांमधून सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या आंदोलनासाठी रेल्वेने जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मराठा समाजातील सर्व स्तरातील घटक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आंदोलनात पुन्हा सहभागी झाले. अपवाद होता तो, मराठा मंत्री, खासदार व आमदारांचा ! बहुतांश लोकप्रतिनिधींनी या आंदोलनापासून अंतर राखल्याचे समोर आले.

दीड दिवसाचा गणपती साजरा करून जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आदल्या दिवशीपासून मार्गस्थ होण्यास सुरुवात झाली. ग्रामीण भागातील बहुतेकांनी रेल्वेला प्राधान्य दिले. कारण, रेल्वेने आझाद मैदान गाठणे जाणे सोपे पडते, असे सकल मराठा समाजाचे पदाधिकारी राम खुर्दळ यांनी सांगितले. मनमाडसह नांदगाव, चांदवड, येवला आणि मालेगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते जनशताब्दी एक्स्प्रेसने मार्गस्थ झाले.

रात्रीपासून मुंबईला जाणाऱ्या वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांमधून हा ओघ सुरू असल्याचे खुर्दळ यांनी म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी नाशिकमधून कालिका मातेचे दर्शन घेऊन मराठे टेम्पो ट्रॅव्हलर व शेकडो मोटारींमधून मुंबईकडे निघाल्याची माहिती करण गायकर यांनी दिली. या वाहनांवर भगवे झेंडे, मनोज जरांगे यांचे छायाचित्र आणि ‘चलो मुंबई… मी येणार, तुम्ही या’ असे आवाहन करणारी स्टिकर्स आहेत.

मराठा आरक्षणासाठी यापूर्वीच्या आंदोलनात सत्ताधारी व विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाठिंबा मिळत होता. नियोजनाच्या बैठकांमध्ये ते सहभागी व्हायचे. आंदोलकांसाठी वाहने वा आवश्यक ती रसद पुरवली जात असे. यावेळी मात्र जिल्ह्यातील मराठा समाजाचे मंत्री, खासदार व आमदारांसह बहुसंख्य माजी नगरसेवकांनी स्वतला अलिप्त राखले. देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे या अखेरच्या क्षणी कालिका मंदिरात पोहोचल्या. त्यांनी आंदोलनास पाठिंबा दिल्याचे नमूद केले.

जिल्ह्यात १५ पैकी निम्म्याहून अधिक मतदारसंघात मराठा समाजाचे आमदार आहेत. यात राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे, नाशिक पश्चिमच्या आमदार सिमा हिरे, नाशिक पूर्वचे राहुल ढिकले, निफाडचे दिलीप बनकर, देवळा-चांदवडचे आ. डॉ. राहुल आहेर यांचा समावेश आहे.

आ. सरोज अहिरे वगळता कुणी यावेळी आंदोलकांची भेट घेण्यासही आले नाही. यामध्ये महापालिकेतील मराठा समाजातील माजी नगरसेवकांचाही समावेश होता. संबंधितांना आवाहन करूनही एखाद्याचा अपवाद वगळता कोणी सहभागी झाले नाही वा, पाठिंबाही दिला नसल्याचे सकल मराठा समाजाचे पदाधिकारी नाना बच्छाव यांनी मान्य केले. मराठा समाज संबंधितांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल, असा इशारा राम खुर्दळ यांनी दिला. जिल्ह्यात १४ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. सरकारविरोधातील आंदोलनास पाठिंबा देणे त्यांनाही अडचणीचे ठरले. परंतु, विरोधी पक्षातील खासदारही का दूर राहिले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.