नाशिक : नाशिक ते मुंबई यादरम्यान समृध्दी महामार्गावरुन राज्य परिवहन महामंडळाची बससेवा जात नसल्याने या महामार्गाचा बसने प्रवास करणाऱ्यांना कोणताच फायदा नसल्याची ओरड सुरु होती. त्यातच मुंबईला समृध्दी महामार्गावरुन जाण्यासाठी घोटी आणि महामार्गावर प्रवेश करतेवेळी द्यावा लागणारा टोल यामुळेही अनेक खासगी वाहनधारकही समृध्दीने जाणे टाळत असताना मुंबईला बसने जाणाऱ्यांसाठी सुखद असा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३० या कालावधीसाठी ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण- २०२५’ जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत राज्यातील द्रूतगती मार्गांवरील खासगी, सरकारी व निमसरकारी अशा सर्व ई-वाहनांना टोलमाफीचा निर्णय झाला होता. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बसेसनादेखील ही टोलमाफी लागू करण्यात आली होती. परंतु, याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले नसल्याने द्रुतगती महामार्गांवर या टोलमाफीची अंमलबजावणी होत नव्हती. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी परिपत्रक काढण्यासाठी पाठपुरावा सुरु केला. छगन भुजबळ यांनी ३ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याबाबत मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत राज्य शासनाकडून २२ ऑगस्ट २०२५ रोजी याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले. तसेच नुकतीच या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे.

या अंमलबजावणीमुळे मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे, मुंबई-शिर्डी, तसेच मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बसेसना टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. टोलमाफीची अंमलबजावणी झाली नसल्याने राज्य परिववहन महामंडळाच्या ई-बसेसना सध्या जुन्याच महामार्गांवरुन प्रवास करावा लागत होता. मुंबई ते नाशिक प्रवास पूर्ण करण्यासाठी जुन्या महामार्गावरून चार ते साडेचार तास लागतात. तसेच टोल देखील भरावा लागतो. कधी वाहतूक कोंडी झाल्यास मुंबई गाठण्यास किंवा मुंबईहून नाशिकला येण्यास पाच तासदेखील लागतात.

समृध्दी महामार्गावरुन एसटीच्या ई बसेसना टोल माफी करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे आता प्रवासाचा वेळ एक तासाने घटणार असून अवघ्या ३.५ तासांमध्ये मुंबई ते नाशिक हे अंतर पार करता येणार आहे. वेळेच्या या बचतीबरोबरच समृद्धी महामार्गावरील आरामदायी व वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाचा आनंद प्रवाशांना घेता येणार आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळाची देखील टोलपासून सुटका होणार असून वार्षिक कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे. एकंदरीतच नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने हा निर्णय नक्कीच खूप फायदेशीर ठरणार आहे.

आगामी काळात राज्य परिवहन महामंडळाकडून मुंबई-छत्रपती संभाजीनगर, मुंबई-नागपूर, नाशिक-छत्रपती संभाजीनगर, नाशिक नागपूर अशा मार्गांवर ई-बसेस सुरू करण्यात आल्यानंतर त्या मार्गावर प्रवास करणाऱ्या ई-बसेसना देखील या निर्णयाचा फायदा होणार आहे.