नाशिक/कोल्हापूर: आधी दुष्काळ आणि नंतर अवकाळीने टोमॅटोची स्थानिक पातळीवरील आवक घटली आहे. याचा परिणाम मुंबईला रोज पाठविल्या जाणाऱ्या मालावर झाला आहे. यामुळे बाजारातील दर किलोला शंभरच्या आसपास आहेत. यंदा उन्हाचा पारा चाळिशीच्या वर राहिल्याने टोमॅटोच्या उत्पादनास त्याचा मोठा फटका बसला आहे.

यंदा या वाढत्या तापमानामुळे उन्हाळी लागवडीतील टोमॅटोच्या रोपांना फुटवे कमी प्रमाणात आले. ऊनपावसाच्या खेळाने करपा रोगाची लागण झाली. झाडांची उंची चांगली न वाढता रोपे खुरटी राहिली. याचा परिणाम उत्पादनावर होत यंदा मोठी घट झाली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत १० ते १५ हजार जाळ्यांची (एक जाळी – २० किलो) आवक होत असते. सध्या हे प्रमाण तीन हजार जाळ्यांवर आले आहे. घाऊक बाजारात क्विंंटलला सरासरी चार हजार रुपये दर आहे. पावसामुळे मालाच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील आवक कमी झाल्याने काही व्यापारी संगमनेर परिसरातून किरकोळ विक्रीसाठी माल आणत आहेत. उन्हाळ्यात लागवड झालेला माल सध्या बाजारात येत आहे. नाशिकच्या बाजार समितीत सध्या टोमॅटोची ८० टक्के आवक कमी झाल्याचे सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्याबाबतच्या मुद्यावर अखेर पडदा, आयोगाला आरोपांबाबत १० जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

कधी तप्त उन्हाचा तडाका, मधेच पावसाचा अवकाळी फटका तर कधी गारपिटीची आपत्ती यामुळे शेती व्यवसायाचे सगळे गणितच सध्या बिघडले आहे. यावर्षी उन्हाळ्यामध्ये पारा चांगला तापला होता. कोल्हापूरसारख्या आल्हाददायक जिल्ह्यातही यंदा अनेक दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसच्याही वर राहिले. याचा परिणाम भाजीपाला पीक वाढीवर झाला आहे. यात सर्वाधिक फटका टोमॅटो उत्पादनास बसला आहे.

यंदा या वाढत्या तापमानामुळे उन्हाळी लागवडीतील टोमॅटोच्या रोपांना फुटवे कमी प्रमाणात आले. ऊनपावसाच्या खेळाने करपा रोगाची लागण झाली. झाडांची उंची चांगली न वाढता रोपे खुरटी राहिली. अशा रोपांना नेहमीच्या प्रमाणात फळे कमी लागतात. याचा परिणाम टोमॅटोच्या उत्पादनावर होत यंदा मोठी घट झाली आहे.

टोमॅटोचे एकरी एक दिवसाआड २५ किलो वजनाचे २०० ते २५० कॅरेट इतके उत्पादन मिळते. यंदा बिघडलेल्या हवामानामुळे हे रोजचे उत्पादन १२५ ते १५० कॅरेटवर आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोमॅटोचे पीक हे ९० ते ११० दिवसांचे असते. यावर्षी उन्हाचा तडाखा वाढल्याने लागवडीवर याचा परिणाम झाला आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारली. तर दुसरीकडे तापमान मात्र चढेच राहिले. याचा परिणाम एकरी उत्पादन घटण्यावर झाला.कृष्णात विठ्ठल हजारेटोमॅटो उत्पादक, कोल्हापूर