जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालमोटार चालकाकडून वाहतूक पोलीस ५० रुपये मागत असल्याची चित्रफीत समाज माध्यमात फिरल्यानंतर, रविवारी संबंधिताचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले होते. पैसे मागणाऱ्या पोलिसाशी संगनमत असल्याच्या संशयावरून सोमवारी आणखी दोघांना निलंबित करण्यात आल्याने या प्रकरणात निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आता तीन झाली असून त्यात सहायक फौजदाराचाही समावेश आहे.

पाचोरा तालुक्यात चाळीसगाव रस्त्यावर नियमितपणे माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना रस्त्यात अडवण्याचे व पोलिसांकडून पैशांची मागणी करण्याचे प्रकार कायम सुरू असतात. वाहनचालकही कायम त्या रस्त्याने माल घेऊन जावा लागत असल्याने नाईलाजास्तव पैसे देतात. काहीवेळी पोलीस अधिक पैशांसाठी अडून बसण्याचेही प्रकार घडतात. नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या अशाच एका चालकाने पोलिसांकडून पैशांची मागणी करण्यात आल्यावर भ्रमणध्वनीद्वारे चित्रफीत तयार करण्याची शक्कल लढवली. वाहतूक पोलीस ५०० रुपयांची मागणी करत असताना, चालक ५० रूपये घेण्याची विनंती करत होता.

घासाघीस करून शेवटी पोलीस १०० रुपयांवर आला, तरीही मालमोटारीचा चालक, आम्ही तुम्हाला नेहमीच पैसे देतो म्हणत ५० रुपये देण्यावर ठाम राहिला. त्यामुळे समोरचा वाहतूक पोलीस आमची ५० रुपयांइतकीच इज्जत आहे का, असा प्रश्न करुन चिडल्याचे चित्रफितीत दिसते. दोघांमध्ये अहिराणी भाषेत झालेल्या संवादाची ती चित्रफीत तीन ते चार महिन्यांपूर्वी तयार करण्यात आली. मात्र, ती शनिवारी समाज माध्यमात आल्यानंतर पैसे घेणारा भ्रष्ट पोलीस कर्मचारी कोण, म्हणून चर्चा रंगली होती. त्यानंतर मालमोटारीच्या चालकाकडून ५० रुपये स्वीकारणारा पोलीस कर्मचारी पवन पाटील याच्यावर रविवारी तडकाफडकी निलंबनाची कारवाई पोलीस अधीक्षकांकडून करण्यात आली. पवनबरोबर इतर वाहनांवर कारवाई करताना चित्रफितीत दिसून आलेले सहायक फौजदार गुलाब मनोरे, हवालदार चेतन सोनवणे यांचेही निलंबन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालमोटारीच्या चालकाकडून पैसे मागितल्याच्या प्रकरणात संशयित असलेल्या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या चौकशीची जबाबदारी आता पाचोरा भागाचे उपविभागीय अधिकारी धनंजय येरोळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सहायक फौजदारासह अन्य दोन कर्मचारी तडकाफडकी निलंबित झाल्याच्या प्रकारानंतर पाचोरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस यंत्रणेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.