लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखालील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने हाती घेतले आहे. या भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रकाश पेट्रोल पंप ते मुंबई नाका चौकपर्यंत पुलाखालून जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने मुंबई नाका परिसरातील महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे परिसरातील सेवा रस्त्यांवर वाहतुकीचा भार वाढला असून मुंबई नाक्याकडून दीपालीनगरकडे जाणाऱ्या भागात वाहतूक कोंडी होत असल्याचे दृष्टीपथास पडते. या कामासाठी उड्डाण पुलाखालील दुसऱ्या बाजूला म्हणजे प्रकाश पेट्रोल पंपसमोरून धुळ्याकडे जाणारा मुंबई नाका चौकापर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

आणखी वाचा-नाशिक : मुलगा झाल्याचे सांगून ताब्यात मुलगी, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

वाहतुकीचे हे निर्बंध बुधवारपासून लागू झाले असून नऊ नोव्हेंबर पर्यंत कायम राहणार आहेत. या काळात इंदिरानगर बोगद्याकडून मुंबईनाक्याकडे जाणारी वाहतूक गोविंदनगर सेवा रस्त्याने मुंबई नाक्याकडे जाईल. तर मुंबई नाक्याहून गोविंदनगरकडे जाणारी वाहतूक ही इंदिरानगरकडील सेवा रस्त्याने जॉगिंग ट्रॅक बोगदामार्गे जाईल. उपरोक्त निर्बंध पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवांना लागू राहणार नसल्याचे उपायुक्त खांडवी यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामार्ग काँक्रिटीकरणामुळे अवजड वाहनांची वाहतूकही सेवा मार्गांनी होत असल्याने या रस्त्यांची दुरावस्था होऊ लागली आहे. अवजड वाहनांचा भार सांभाळण्याइतपत क्षमता सेवा रस्त्यांची नाही. काँक्रिटीकरणाचे काम ज्या ज्या भागात होते, त्या भागातील सेवा रस्त्यांवर वाहतुकीचा अधिकचा भार पडत आहे.