नाशिक – कसारा ते इगतपुरी दरम्यान घाटात मुंबईकडून येणाऱ्या रेल्वे मार्गावर सायंकाळी मालगाडीचे सात डबे घसरल्याने प्रवासी गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. अनेक गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर रोखून धरण्यात आल्या. कल्याण आणि इगतपुरी स्थानकावरील दुर्घटना सहायता गाडी अपघातस्थळी रवाना करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> जळगावात तरुणाचा खून; दोन जण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कसारा घाटातील एका मार्गावर ही दुर्घटना घडली. मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले. कसारा ते इगतपुरी दरम्यान घाटात तीन रेल्वेमार्ग आहेत. मालगाडी कसाऱ्याहून इगतपुरीकडे येणाऱ्या मार्गावरून घसरली. त्यामुळे मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा परिणाम घाटातील मध्य मार्गावर झाला असून तो मार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इगतपुरीकडून कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक सुरू आहे. या अपघाताचा उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. परंतु, मुंबईकडून नाशिकमार्गे जाणाऱ्या प्रवासी गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. मुंबई-हावडा, अदिलाबाद-नंदीग्राम, मुंबई-गोंदिया विदर्भ, मुंबई-मनमाड-पंचवटी, मुंबई-नांदेड, मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल, लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रतापगड अशा एक्स्प्रेस उंबरमाळी, घाटकोपर, विक्रोळी आदी विविध स्थानकांवर रोखून धरण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यात मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल, मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. अमरावती, हावडा, सिकंदराबाद, शालिमार, वाराणसी, पाटलीपुत्र एक्स्प्रेस या गाड्याही वळविण्यात आल्या आहेत. कल्याण स्थानकापलीकडे असणाऱ्या चार गाड्या वळवल्या जाऊ शकत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.