नाशिक : शहर परिसरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता पोलिसांच्या कार्यशैलीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. पोलीस आयुक्तालयाकडून खांदेपालट करत समाजकंटकांना शह देण्याचा प्रयत्न होत असला तरी या बदली सत्राने अंतर्गत नाराज अधिकारी आणि कर्मचारी हेरुन काही दलालांकडून त्यांच्या बदलीसाठी खंडणी मागण्याचा प्रयत्न होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोन खंडणीचे गुन्हे दाखल झाले. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. एक जण फरार आहे.
शहरातील काही महत्वाच्या पोलीस ठाण्यात बदलीसाठी पोलीस अधिकारी – कर्मचारी यांचे प्रयत्न होत असतात. आपल्या आवडत्या कामाच्या ठिकाणी कामाचा आवाका आणि वरिष्ठांचा वरदहस्त महत्वाचा ठरतो. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अंमलदार प्रशांत नागरे यांनी मुंबई नाका पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार नितीन सपकाळे आणि सागर पांगरे-पाटील या दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरे यांनी केलेल्या तक्रारीनुसार गुरूवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास संशयितांनी ‘व्हॉटसॲप कॉल’ केला. त्यात ‘आपली वरपर्यंत ओळख असून, भद्रकालीच्या सध्याच्या दुय्यम निरीक्षकांची इंदिरानगर पोलीस ठाण्यात ‘प्रभारी’ पदावर बदली करून देतो. त्यासाठी प्रत्यक्ष भेटून बोलू’, असे सांगितले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता सपकाळे हा चांडक सर्कल परिसरात आला. त्यावेळी नागरे यांना बोलावून घेत आपली वरपर्यंत ओळख असल्याचे भासवले. बदलीसाठी ३५ लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास चांगल्या ठिकाणी बदली होणार नाही, असे सांगितले. त्यावरून अंमलदार नागरे यांनी पुराव्यासह मुंबई नाका पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. या प्रकारानंतर मुंबई नाका पोलिसांनी सागर पांगरे-पाटील याला ताब्यात घेतले असून, तो बांधकाम व्यवसाय क्षेत्राशी संबंधित आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ३० जुलैपर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
दुसऱ्या घटनेत संशयित सागर पांगरे-पाटील याने १५ जुलै राेजी मालेगाव शहर पाेलीस ठाण्यात कार्यरत गाैतम बाेराळे यांच्याशीही संपर्क साधून बाेराळे आणि या प्रकरणातील मध्यस्थ नितीन सपकाळे या दाेघांना बोलावले. ग्रामीण पाेलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) येथे नेमणूक देण्यासाठी दाेन लाख रुपये घेतले. परंतु, नेमणूक दिली नाही. म्हणून बाेराळे यांनी सागर पांगरे याला विचारणा केली असता, त्याने आणखी एक लाखाची मागणी केली. पैसे न दिल्यास ‘तुमची अन्यत्र काेठेही बदली हाेऊ देणार नाही’ अशी धमकी दिली. या प्रकरणी बाेराळे यांनी मुंबई नाका पाेलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या दाेन्ही प्रकाराबाबत पोलीस आयुक्तालय कार्यालयाकडून सखोल चौकशी होत आहे.