नंदुरबार : शहरात दोन युवकांमध्ये झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी जय वळवी या तरुणाचा १७ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील इतर शासकीय आवारांमध्ये उभ्या असलेल्या आठ ते १० वाहनांची तोडफोड केली.
काही वाहने उलटविण्यात आली. काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर जमावातील उपद्रवी इतरत्र पळाले. सध्या नंदुरबारमध्ये तणाव असून पोलीस परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. दगडफेकीत प्राथमिक माहितीनुसार पोलीस निरीक्षकासह तीन जण जखमी आहेत.
काही दिवसांपूर्वी जय वळवी या युवकावर सूर्यकांत मराठे याने 16 सप्टेंबर रोजी हल्ला केला होता. हल्ल्यात गंभीर जखमी जय वळवीचा १७ सप्टेंबर रोजी रुग्णालयात मृत्यू झाल्याने आदिवासी समाजामध्ये असंतोष होता. जय वळवीच्या मारेकऱ्याविरुध्द कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आदिवासी संघटनांच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी दोनच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सुमारे १५ हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा आल्यानंतर मयत वळवीचे नातेवाईक आणि काही जण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले. त्यावेळी मोर्चातील काही उपद्रवींनी बळजोरी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातही शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांना त्यांना रोखले. त्यानंतर काही उपद्रवींनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासह इतर शासकीय कार्यालयांच्या परिसरात असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास आणि ती उलटवून देण्यास सुरुवात केली.
आठ ते १० गाड्यांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी उपद्रवींवर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परंतु, परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने आणि दगडफेक होऊ लागल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दगडफेकीत पोलीस निरीक्षक, एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ता असे तीन जण जखमी झाले. दरम्यान, मयत वळवी यांचे नातेवाईक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोर्चेकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. परंतु, मोर्चा मधील उपद्रवी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शासकीय कार्यालयांच्या आवारातून पोलिसांनी उपद्रवींना बाहेर काढले असून सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.