जळगाव – इयत्ता बारावी परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने जिल्ह्यातील ममुराबाद आणि पाचोरा येथे सोमवारी दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेतला. ममुराबाद येथील ऋषिकेश पाटील (१८) याने विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. प्रश्नपत्रिका उत्तम पध्दतीने सोडविल्याने त्यास चांगल्या गुणांची अपेक्षा होती. मात्र, सोमवारी दुपारी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर केवळ ४९ टक्के गुण मिळाल्याचे लक्षात येताच तो नैराश्यात गेला.

त्यातूनच त्याने घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास घेतला. काही वेळाने त्याच्या आईला घडला प्रकार लक्षात आल्यावर ऋषिकेशला तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषीत केले. दुसरी घटना पाचोरा येथे घडली.

भावेश महाजन (१९, रा.एरंडोल) हा बारावीची परीक्षा दिल्यानंतर काही दिवसांसाठी पाचोरा येथे बहिणीकडे गेला होता. रविवारी त्याची बहीण आणि मेहुणे पुणे येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. सोमवारी दुपारी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर फक्त ४२ टक्के गुण मिळाल्याचे पाहून भावेश निराश झाला. त्यातूनच त्याने बहिणीच्या राहत्या घरी गळफास घेतला. त्याची दुसरी बहीण पाचोरा शहरातच वास्तव्यास होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भावेशशी तिने भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, पलिकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तिने चौकशीसाठी त्याच्या मित्राला तिकडे पाठवले. तेव्हा भावेशने गळफास घेतल्याचे दिसले. या दोन्ही घटनांची ममुराबाद आणि पाचोरा पोलिसांनी नोंद घेतली आहे.