लोकसत्ता वार्ताहर

धुळे : शहरातील श्रीनगर युवा मित्रमंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत परिसरातील गणेश भक्तांसह घरगुती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन्ही भावांचा हत्ती डोहाच्या पुढे असलेल्या पांझरा नदीवरील बंधाऱ्यात बुडाल्याने मृत्यू झाला.

मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. धुळे तालुक्यातील बिलाडी गावापासून अलीकडे साधारणपणे चार किलोमीटरवर असलेल्या हत्ती डोहाच्या पुढे पांझरा नदीवर बंधारा आहे. या बंधाऱ्यात धुळे शहरातील अनेक जण गणेश विसर्जन करतात. धुळे तालुक्यातील नेर येथील लोकेश पाटील (१९) आणि चैतन्य पाटील (२२) हे दोघे भाऊही पांझरा नदीवरीतल बंधाऱ्यात घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाय घसरून दोघेही बुडाले. यावेळी दोघांनीही बचावासाठी प्रयत्न केले, परंतु, दुर्दैवाने आजूबाजूला पट्टीचे पोहणारे कुणीही नसल्याने त्यांचा बचाव करू शकले नाही.

आणखी वाचा-नाशिक जिल्ह्यात विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू, एकाचा शोध सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही जणांनी पाण्यात जाऊन दोघांना बाहेर काढले, लगेचच त्यांना धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तथापि, डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. दोघेही धुळ्यातील जयहिंद वरिष्ठ महाविद्यालय रस्त्यावरील एकविरा मोबाईल शॉपचे संचालक सुनील पाटील आणि भाजप मंडळाध्यक्ष छाया पाटील यांची मुले आहेत. धुळे तालुका पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.