मालेगाव : शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या ओडिसामधील दोघा नागरिकांचे खंडणीसाठी अपहरण करून त्यांना एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचा सुगावा लागल्याने पैशांसाठी अपहरण व डांबून ठेवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मालेगाव तालुका पोलिसांना यश आले आहे. या कारवाईनंतर दोघा अपहृत नागरिकांची सुखरूप सुटका झाली आहे.

सदर घटनेतील फिर्यादी टिपी प्रसाद राजू (२९,पुकाली, जिल्हा कोरापुट ओडिसा) व त्याचा मित्र जलंदर पोडाल हे दोघे गेल्या ९ ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते. हे दोघे स्वतःच्या कारने राष्ट्रीय महामार्गावरील धुळे टोलनाका परिसरातून जात असताना मालेगाव तालुक्यातील मेहुणे येथील समाधान निंबा देवरे व त्याच्या अन्य चार साथीदारांनी धुळे टोलनाका परिसरातून दोघांचे अपहरण केले. त्यानंतर मालेगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये त्यांना डांबून ठेवले. त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. सन २०२० मध्ये घेतलेल्या पैशांची परतफेड करावी,असे म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. तसेच राजुकडून वेळोवेळी ऑनलाईन व्यवहाराद्वारे ४० हजार रुपये काढून घेण्यात आले. त्यांच्याकडील कार व दोन मोबाईल फोन असा एकूण ७ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज देखील बेकायदेशीरपणे काढून घेण्यात आला.

सदर घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ हालचाल करून कौळाणे-मनमाड रोडवरील हॉटेलवर छापा टाकला. संशयीतांविरोधात कारवाई करुन राजू व त्यांच्या मित्राची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. या कारवाईदरम्यान संशयीत समाधान देवरे व त्याच्या साथीदारांनी हॉटेल मधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना शिताफिने पकडले.

याप्रकरणी तालुका पोलिसांनी समाधान देवरे (३४), शिवाजी आहिरे (२१),सोमनाथ आहेर (२२),गणेश मेंडायत (२४), शिवम पैठणकर (२२)  यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ‌जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकार यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रितम चौधरी,उपनिरीक्षक तुषार भदाणे, दामोदर काळे, पोलीस हवालदार रतिलाल वाघ, अमोल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.