नाशिक : इगतपुरीजवळ समृध्दी महामार्गावरील बोगद्यात शनिवारी सकाळी खासगी बसला अपघात होऊन चालकासह दोघांचा मृत्यू झाला. ही बस रायगडच्या कर्जत तालुक्यातील दहिवली येथून शेगावला जात होती.दहिवली येथील एकाच कुटूंबातील २३ भाविक खासगी बसने देवदर्शनासाठी शेगावला निघाले होते. समृध्दी महामार्गाने बस जात असताना शनिवारी सकाळी इगतपुरीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने बस बोगद्यातील दुभाजकावर चढत असतांना चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बस पूर्णपणे फिरली. या अपघातात चालक दत्ता ढकवळ याच्यासह एक जण बाहेर फेकला गेला.
अपघाताची माहिती मिळताच इगतपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सारिका अहिरराव, उपनिरीक्षक कांचन भोजणे यांचे पथक आणि महामार्ग सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना समृध्दी महामार्गाच्या रुग्णवाहिकेतून इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात गंभीर जखमी चालक ढकवळ यांचा मृत्यू झाला. अन्य काही लोकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना इगतपुरी येथील एसएमबीटी या सेवार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी दुपारी सुरेश लाड (६०, रा. दहिवली, कर्जत) यांचा मृत्यू झाला.
अपघातात नंदकुमार मोरे (५४), आकाश गरूड (२५), शशिकांत लाड (६५) हे गंभीर जखमी झाले आहेत. रेखा लाड, राजेश लाड (५१), अशोक लाड (६१) हे किरकोळ जखमी आहेत. इतर प्रवाशांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी बसमध्ये २३ प्रवासी होते, अशी माहिती दिली.
