लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: खासगी बसमधील प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या दोन आंतरराज्यीय गुन्हेगारांना दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
अंकलेश्वर येथील सुनिता गुप्ता या छत्रपती संभाजीनगर येथून मुसाफिर कंपनीच्या बसमधून सूरत येथे जाण्यासाठी प्रवास करीत असतांना दिंडोरी परिसरात संशयितांनी त्यांच्या ताब्यातील दागिने, रोख रक्कम, भ्रमणध्वनी चोरले. चोरी लक्षात आल्यावर त्यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
आणखी वचा-आमच्या मर्जीने बिहारची मुले शिक्षणासाठी महाराष्ट्रात; कथित तस्करी प्रकरणात पालकांचा दावा
निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही तसेच अन्य माहिती जमा केली. त्याआधारे समिन सय्यद (२०, रा. नवसारी) आणि मोहम्मद खान (२३, रा.नवसारी) यांना चिखली येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, भ्रमणध्वनी असा दोन लाख १८,०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपासी पथकास १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.