नाशिक – पावसाळा सुरु झाल्यावर शेतकरी शेतीच्या कामात मग्न होतो. तर, शहरातील वृक्षप्रेमी घराच्या परिसरात, गच्चीत बाग फुलविण्यास सुरूवात करतात. रोपे लावण्यासाठी पावसाळा हा योग्य काळ असल्याने रोपे लावण्याचे प्रमाण पावसाळ्यात वाढते. बऱ्याचदा पावसाळ्यात शोभेची, फुलांची रोपे खरेदी करण्याकडे कल असतो. ग्राहकांकडून असणारी मागणी लक्षात घेऊन रोपवाटिकांमध्ये त्याप्रमाणे रोपे तयार करण्यात येत आहेत. काही रोपवाटिकांमधील रोपांना मागणी कमी असली तरी, काहींना मात्र मागणी वाढली आहे.
यंदा मे महिन्यात वळवाच्या पावसाने अनेक दिवस मुक्काम ठोकला होता. त्यामुळे पावसाळा सुरु होण्याआधीच परिसर हिरवागार झाला होता. पावसाळ्याआधीच भटक्यांनी डोंगर, दऱ्यांमध्ये भटकंतीस सुरूवात केली होती. वृक्षप्रेमीही त्यामुळे आनंदले. जून महिन्यात येणाऱ्या पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रोपांची खरेदी केली जाते. यावर्षी पाऊस आधीच झाल्याने पर्यावरण दिनाआधीच काही जणांकडून रोपांची खरेदी करण्यात आली.
वांगी, भेंडी, पालक, मेथी यासह अन्य वेली याच काळात गच्ची किंवा घराच्या अंगणात लावण्यात येतात. याशिवाय कोणाचा वाढदिवस, शुभेच्छा देण्यासाठी तसेच वेगवेगळ्या प्रसंगानिमित्त रोपे शुभेच्छा स्वरूपात दिले जातात. याविषयी हिरवे पुण्य नर्सरीचे चिरंतन पारेख यांनी माहिती दिली. मागील दोन वर्षापासून रोपवाटिका व्यवसायाला वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. रोपांना तुलनेत कमी मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. आमराई नर्सरीचे मालक सागर मोतकरी यांना मात्र वेगळा अनुभव आला आहे. करोना तसेच त्यानंतर लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे रोपांना मागणी वाढली आहे.
शनिवार आणि रविवारी मिळणारा वेळ हा बागकामासाठी वापरला जात आहे. शाळेमध्येही वेगवेगळ्या कारणांमुळे रोपे मागितली जात आहेत. पावसाळा सुरु झाल्यापासून रोपवाटिकेकडे वेगवेगळ्या रोपांची मागणी होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १० टक्के वाढ झाली आहे. याशिवाय अनेक जणांना आजही घरातूनच कार्यालयीन कामे करावी लागत असल्याने मंचावर ठेवण्यासाठी छोटी रोपे मागितली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांकडून गुलाब, मोगरा, झेंडु, निशीगंध या फुलझाडांसह परसबागेसाठी फळभाज्यांची मागणी होत आहे. प्राणवायू अधिक प्रमाणात सोडणाऱ्या झाडांना मागणी आहे. रोपांसाठी लागणारी लाल माती ४० रुपये पाटी याप्रमाणे दर आहेत. कोकोपीट, खत, कुंड्या, बागकाम साहित्य याची मागणी वाढत आहे.
घरात एक हिरवा कोपरा असावा यासाठी कायमच प्रयत्न करते. मला फुलझाडे आवडतात. घरातील सज्जामध्ये फुलझाडांसह काही फळभाज्या लावण्यात आल्या आहेत. पावसात झाडे जगतात म्हणून एकतरी रोप लावले जाते. घरातील हिरवळ वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येतो. – प्रज्ञा काकडे (गृहिणी)