नाशिक – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपबरोबर असलेले पक्ष वगळून इतर पक्षांबरोबर जाण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर घेतील, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी सांगितले. येथे आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यानंतर सुजात आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याव्दारे पक्ष संघटनेचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढत आहे. त्यासंदर्भात माहिती घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणाबरोबर जायचे की स्वतंत्र लढायचे, याचा निर्णय आमचे नेते घेतील. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते काम करत आहेत, आमची लढाई स्वाभिमानाची आहे, असेही त्यांनी नमूद केले. अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो. मुंबईतही लोकल रेल्वेतून पडून चार जणांचा मृत्यू झाला. बंगळूरुमध्ये दुर्घटना झाली. यास सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार आहे ,असा आरोप त्यांनी केला.