राजापूरसह ४१ गावे योजनेच्या बिगर सिंचन पाणी योजनेला मान्यता; प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरुवात

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर, चांदवड, येवला, नांदगाव या तालुक्यांमध्ये पाणी टंचाई आणि दुष्काळ ही समस्या कायमचीच असली तरी काही दिवसांपासून या समस्येवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले असून त्याचाच एक भाग म्हणून येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण आणि दुष्काळी भागातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पाणी आरक्षण प्रस्तावास जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. यासाठी १६२ कोटींचा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे.

या योजनेची निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.  राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन त्यासाठी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर निधी मंजूर केला. या योजनेसाठी २०३७ ची लोकसंख्या गृहीत धरुन निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर धरणातून २.२६८ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला होता. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेल्या या बिगर सिंचन पाणी आरक्षण प्रस्तावास शासनाने मंजुरी दिल्याने योजनेच्या मार्गातील मोठी समस्या दूर झाली आहे.

या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत तालुक्यातील राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अंगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, खरवंडी, रहाडी,पिंपळखुटे (तिसरे), पन्हाळसाठे, वाघाळे, आहेरवाडी, कोळम खुर्द, पांजरवाडी, जायदरे, हडपसावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडा, भुलेगाव, मातुलठाण, कौटखेडे, आडसुरेगाव, धामणगाव, लहीत, गोरखनगर, वसंतनगर, चांदगाव, भायखेडा, कोळम बुद्रुक, कोळगाव, कूसमाडी, नायगव्हाण, खिर्डीसाठे, घना माळी मळा, महालगाव, गणेशपूर, कासारखेडे, दुगलगाव, बोकटे या ४१ अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावांचा समावेश आहे. प्रादेशिक पाणी योजनेच्या कामाला आता लवकरच सुरुवात होणार असून त्यामुळे अवर्षणप्रवण अशा येवला तालुक्यास मोठय़ा प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.

पाणी पुरवठा असा होणार..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या योजनेसाठी नांदुरमध्यमेश्वर धरणातून आरक्षित करण्यात आलेले पाणी जॅकवेल पंपाद्वारे येवला तालुक्यातील पन्हाळसाठे येथे आणण्यात येणार आहे. पन्हाळसाठय़ातील शुद्धीकरण प्रकल्पात पाण्याचे शुद्धीकरण करून येथून गुरुत्वाकर्षणाव्दारे (ग्रॅव्हिटीद्वारे) सर्व ४१ गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे.