जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी दोन हजाराहून अधिक वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने नवीन उच्चांक केला होता. गुरूवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा मोठे बदल दरात झाल्याने सोन्याने आदल्या दिवसाचा उच्चांक मोडीत काढत नवीन उच्चांक केला. ग्राहकांसह व्यावसायिक त्यामुळे अवाक झाले.देशात सोन्याच्या दरवाढीचा ट्रेंड कायम राहिल्याने सलग चौथ्या दिवशी गुरूवारी सोन्याच्या किमतींमध्ये वाढ नोंदवली गेली. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम एक लाख २७ हजारावर जाऊन पोहोचला.

सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने विशेषतः धनतेरस आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काही घटक सोन्याच्या उच्चांकी दरवाढीला कारणीभूत ठरले आहेत. अमेरिकन सरकारच्या शटडाऊनची शक्यता आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांमध्ये कपात होण्याच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोन्याकडे वाढल्याचे बोलले जात आहे.

साधारणतः व्याजदर वाढले की गुंतवणूकदार बाँडमध्ये पैसे गुंतवतात, कारण ते अधिक परतावा देतात. परंतु, व्याजदर कमी झाल्यास सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढते. याच कारणामुळे सध्या सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे जाणकारांनी सांगितले. जळगाव शहरात बुधवारी दिवसभरात २१६३ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोने एक लाख २६ हजार ६९० रूपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले होते. गुरूवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ४१२ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने एक लाख २७ हजार १०२ रूपयांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.

सोन्यासोबत चांदीच्या किंमतीतही अलीकडे मोठी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते या वाढीमागे औद्योगिक मागणी हा प्रमुख घटक आहे. सौर ऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रॉनिक्स आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये चांदीच्या वाढत्या वापरामुळे या मौल्यवान धातुची मागणी झपाट्याने वाढली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत चांदीच्या एकूण मागणीपैकी सुमारे ६० ते ७० टक्के मागणी औद्योगिक क्षेत्रातून होत आहे. याच कारणामुळे अलीकडच्या काळात चांदीने सोन्यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी केली आहे. सप्टेंबर महिन्यात चांदीच्या दरात तब्बल १९.४ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर याच कालावधीत सोन्याच्या किमती फक्त १३ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

उद्योग क्षेत्रातील वाढता वापर आणि जागतिक स्तरावर स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने होणाऱ्या बदलांमुळे चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शहरात बुधवारी दिवसभरात सुमारे ४१२० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदी एक लाख ६० हजार ६८० रूपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचली होती. गुरूवारी सकाळी बाजार उघडताच दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदवली गेली नाही. त्यामुळे चांदीचे दर स्थिर राहिले.