नाशिक – जळगावमधील एका प्रकरणात एमपीडीए कायद्याचा बेजबाबदारपणे वापर केल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आयुष प्रसाद यांना दोन लाख रुपये दंड ठोठावला होता. या निकालानंतर शासनाने त्यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी बदली केली. नाशिक जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रसाद यांनी उपरोक्त विषयावर भाष्य केले.

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नियोजनाची मुख्य जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रशासकीय वर्तुळात मोठे फेरबदल करण्यात आले. त्या अंतर्गत नाशिक जिल्हाधिकारीपदी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. बुधवारी प्रसाद यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रसाद यांनी कुंभमेळा हाच जिल्ह्याचा प्राधान्यक्रम राहणार असून त्यासाठी विशेष नियोजन केले जाईल, असे स्पष्ट केले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नियोजित विविध प्रकल्पांसाठी जागांची उपलब्धता होणे महत्वाचे आहे. जागा नसतील तर, हे प्रकल्प पुढे जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी कोणकोणत्या माध्यमातून जागांची उपलब्धता करता येईल, यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

विविध प्रकल्पांबरोबर आपत्ती व्यवस्थापन, सुशासन, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्राचा वापर करून प्रशासनात पारदर्शकता आणण्यावर भर दिला जाईल. कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची प्रसिध्दी करण्यावर लक्ष दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, एमपीडीए कायद्याचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने प्रसाद दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. दंडांची रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल करून एमपीडीए अंतर्गत कारवाई झालेल्या तरुणाला देण्याचे आदेशही न्यायालयाने शासनाला दिले आहेत. त्यानंतर प्रसाद यांची बदली करण्यात आली. या संदर्भातील प्रश्नावर प्रसाद यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा राज्य सरकार अभ्यास करीत असल्याचे नमूद केले. अभ्यासांती पुढे काय करायचे, याचा निर्णय घेतला जाईल. जळगावमध्येही आपण यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. या विषयात गृह विभाग आणि विधी व न्याय विभागाचे मार्गदर्शन घेतले जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने पुढील कार्यवाही केली जाईल, असे प्रसाद यांनी म्हटले आहे.