धुळे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, धुळे शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस दलार्तर्फे संपूर्ण शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्याची योजना आखण्यात आली आहे. वेगवेगळ्या भागात आणि तालुक्यांमध्ये पायी गस्त घालून पोलिस अधिकारी दुकानांना प्रत्यक्ष भेटी देणे आणि ध्वनीक्षेपकाद्वारे घोषणा देवून जनजागृती करीत आहेत.यामुळे धुळेकरांना यंदाची दिवाळी निर्धास्तपणे साजरी करून सणाचा आनंद उपभोगता येईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

चोरी आणि दरोड्यांची शक्यता लक्षात घेवून पोलीस विभाग सध्या व्यापारी, दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील, यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. दीपोत्सवात बहुतांश नागरिक नातेवाईकांकडे जात असतात. अशावेळी चोरट्यांना आयती संधी मिळते. त्यामुळे बाहेरगावी जाताना आपल्या घराची सुरक्षितता कशी राखावी, याकरीता पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीसअधीक्षक अजय देवरे, उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह जिल्ह्यातील सर्वच प्रभारी अधिकारी त्या त्या भागात जनजागृती मोहीम राबवित आहेत.

देवपूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांच्याकडून रिक्षामधून ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती केली जात आहे. बाहेरगावी जाताना स्थानिक पोलीस ठाण्याला कळवा, घरात किमती वस्तू, रोख रक्कम न ठेवता बँकेत सुरक्षित ठेवावी, बाहेरगावी जात असल्याबाबत शेजार्‍यांनाही कल्पना द्या, आपापल्या परिसरात सीसीटीव्ही बसवा, अशा सूचना देण्यात येत आहेत. पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार हे आपल्या कर्मचार्‍यांसोबत बाजारपेठेत पायी गस्त घालून व्यापारी, दुकानदारांच्या भेटी घेऊन त्यांना सर्तकतेच्या सूचना करीत आहेत.

आपल्या दुकानाबाहेर सुरक्षारक्षक नेमावा, सीसीटीव्ही बसवावेत, संशयित आढळल्यास तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधवा, अशा सूचना करण्यात येत आहेत. नरडाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक निलेश मोरे यांनी देखील गावागावात जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली असून विविध आस्थापनांच्या मालकांना सतर्कतेचे व सुरक्षिततेचे आवाहन केले आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण बर्गे यांनी जनजागृती करणार्‍या सूचनांची भित्तीपत्रके छापून त्यांचे घराघरात आणि दुकानांमध्ये वाटप केले आहे.

दोन तडीपार ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी धुळे तालुक्यातील तिसगाव ढंढाणे गावातील तडीपार असलेल्या नितीन पाटील आणि समाधान पाटील या दोघांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर पश्‍चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता स्थानिक गुन्हे शाखेने आणखी दोघा तडीपार गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. गोपाल चौधरी (रा..शिरपूर) आणि सुनील मरसाळे (रा.साक्री) हे दोघे तडीपार गुन्हेगार त्यांच्या घरात आढळून आले. या दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.