लोकसत्ता वार्ताहर

नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खोकसा, कोटखांब, कामोद , सरी , नागझरी, बोरझर करंजी या गावांच्या जंगल, डोंगर, दऱ्यांच्या परिसरातून तीन ते चार दिवसांपासून काही आवाज येत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यांना रात्र जागून काढावी लागत आहे.

नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील गुजरात आणि धुळे जिल्ह्यांना लगत असलेल्या काही गावांच्या जंगल परिसरातून काही दिवसांपासून येत असलेल्या गूढ आवाजाने ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले आहेत. दोन दिवसांपासून आवाजासह जमीनदेखील हलत असल्याने पडझड होवून नुकसान होऊ नये म्हणून आश्रमशाळेतील मुलांसह ग्रामस्थ रस्त्यावरच रात्र काढत आहेत. याबाबत बुधवारी सायंकाळी नवापूर पोलिसांसह तहसीलदार आणि काही नेते परिसरात पाहणीसाठी गेले होते. त्यांनाही ग्रामस्थांकडून आवाजाविषयी सांगण्यात आले. हे आवाज भूकंपाच्या धक्क्यामुळे येत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. परंतु, नवापूरचे तहसीलदार दत्ता जाधव यांनी घटनास्थळी जाऊन हे भूकंपाचे धक्के नसल्याचे सांगितले. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनीही हे धक्के भूकंपाचे नसल्याचा दावा केला.

आणखी वाचा-नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

दुसरीकडे, शहादा तालुक्यातील सावळदा येथील भूकंप मापक केंद्राच्या अधिकाऱ्यांनी संबंधित भागात बुधवारी भूकंपाच्या सौम्य धक्क्याची पुष्टी केली आहे. तशी नोंद गुजरातच्या गांधीनगर भूकंप मापक केंद्रात झाली आहे. हे केंद्र उकई धरणापासून ४० किलोमीटरवर नवापूर तालुक्यातील याच परिसरात आहे. पहिला धक्का १.४ रिश्टर स्केलचा रात्री १० वाजून दोन मिनिटांनी तर, १०.२५ मिनिटांनी १.५ रिश्टर स्केलच्या धक्क्याची नोंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, असा आवाज काही दिवसांपासून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परिसरात काही औद्योगिक वसाहतींचे काम, त्यानंतर इंडियन ऑईलच्या गॅस पाईपलाईनचे काम, यामुळे असे आवाज होत असतील, असे ग्रामस्थांना वाटत होते.

आणखी वाचा-भुजबळांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, संशयितास पोलीस कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन, तीन दिवसांपासून या आवाजात वाढ झाल्याने ग्रामस्थांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. याबाबत नाशिक येथील मेरी संस्थेचे अधिकारीही दोन दिवसात या परिसराला भेट देणार असल्याचे स्थानिक आमदार शिरीष नाईक यांनी सांगितले. भूकंपाच्या धक्क्यांविषयी भूकंप मापक केंद्र आणि स्थानिक महसूल प्रशासन यांच्या माहितीत परस्परविरोध दिसून येत आहे. त्यामुळे हे आवाज नेमके कसले, याबाबत प्रशासनानेच स्पष्टोक्ती करण्याची गरज आहे.