जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी सर्वकालीन उच्चांक गाठणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरात मंगळवारी सकाळी बाजार उघताच पुन्हा मोठी दरवाढ नोंदवली गेली. दिवाळी आधीच दोन्ही धातुंनी उच्चांकी दराच्या माध्यमातून दिवाळी साजरी केल्याने ग्राहकांसह व्यावसायिक अवाक झाले.

सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे आणि पुढील आठवड्यात दिवाळीची धामधूम साजरी होणार आहे. तत्पूर्वीच, सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. भारतात लग्नसराई, शुभ प्रसंगी आणि दिवाळीसाठी सोने खरेदी करणे एक परंपरा मानले जाते. सोन्याचा भारतीय संस्कृतीशी सुद्धा जुना संबंध आहे. दरम्यान, देशांतर्गत किरकोळ बाजारात सोन्याच्या किमतीत दररोज मोठी वाढ होत आहे. येत्या काळात सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात. ज्यामुळे या किमतींमध्ये गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरू शकेल. तथापि, उच्चांकी दरवाढीमुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघांनाही सावधगिरी बाळगावी लागत आहे. दिवाळीच्या आसपास सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

सोने आणि चांदीच्या किमती वेगाने वाढत असल्याने हा काळ ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांसाठीही महत्त्वाचा असल्याचे सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शहरात १५४५ रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २७ हजार ७२० रुपयांवर पोहोचले होते. सोमवारी दिवसभरात आणखी ८२४ रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने जीएसटीसह एक लाख २८ हजार ५४४ रूपयांचा नवीन उच्चांक केला. मंगळवारी देखील सकाळी बाजार उघडताच पुन्हा १७५१ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने एक लाख ३० हजार २९५ रूपयांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.

चांदीत २०६० रूपयांनी वाढ

शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी चांदीत प्रतिकिलो १० हजार ३०० रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने चार दिवसातील वाढ २४ हजारांपेक्षा अधिक झाली. शहरात आठ ऑक्टोबरला चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो एक लाख ६० हजार ६८० रुपयांपर्यंत होते. त्यानंतरच्या दोन दिवसांत अचानक मोठी दरवाढ झाल्याने शनिवारपर्यंत चांदीने एक लाख ७५ हजार १०० रुपयांचा उच्चांक गाठला. त्यात सोमवारी आणखी १० हजार ३०० रुपयांची वाढ नोंदवली गेली. परिणामी, चांदी जीएसटीसह प्रतिकिलो एक लाख ८५ हजार ४०० रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचली. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा २०६० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीने एक लाख ८७ हजार ४६० रूपयांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.