जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरूवारी एकाच दिवसात आठ हजाराहून अधिक दरवाढ झाल्याने चांदी एक लाख ७० हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा मोठी झेप घेऊन चांदीने नाव काढले. सोन्याच्या दरात मात्र मोठी घट नोंदवली गेली.
देशात सोन्याच्या दरवाढीचा ट्रेंड कायम राहिल्याने गुरूवारी २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २७ हजारावर जाऊन पोहोचला होता. सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने विशेषतः धनतेरस आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात आली होती. प्रत्यक्षात, शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच तब्बल २१६३ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २५ हजार १४५ रूपयांपर्यंत खाली आले. शहरात गुरूवारी ६१८ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने एक लाख २७ हजार ३०८ रूपयांचा नवीन उच्चांक केला होता.
तज्ज्ञांच्या मते, लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात सोने तसेच चांदीची मागणी नेहमीच वाढत असते. मात्र, शुक्रवारी बाजारात झालेल्या अचानक घसरणीने गुंतवणूकदार आणि खरेदीदार दोघांनाही अनपेक्षित धक्का बसला. किंमतीतील या चढ-उतारामुळे बाजारातील अनिश्चितता आणखी वाढली असून, पुढील काही दिवसांत सोन्याचे दर स्थिरावतील की त्यात आणखी घसरण होईल, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तांमध्ये नफा बुक करण्यास प्रवृत्त केल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण सुरू झाली. तरीही सोने सलग आठव्या आठवड्यात तेजीच्या मार्गावर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सोन्यासोबत चांदीच्या किंमतीतही अलीकडे मोठी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते या वाढीमागे औद्योगिक मागणी आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी हे प्रमुख घटक आहेत. सौर ऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रॉनिक्स आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये चांदीच्या वाढत्या वापरामुळे देखील चांदीची मागणी वाढली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत एकूण मागणीपैकी सुमारे ६० ते ७० टक्के मागणी औद्योगिक क्षेत्रातून होत आहे. शहरात गुरूवारी दिवसभरात तब्बल ८२४० रूपयांची वाढ झाल्याने चांदीने एक लाख ६८ हजार ९२० रूपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला होता. शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ३०९० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ७२ हजार १० रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर जाऊन पोहोचली. तीनच दिवसांत सुमारे १५ हजार ४५० रूपयांची वाढ झाल्याने चांदीने नवा विक्रम केला.
चांदीसाठी प्रिमियम दराने पैसे मोजुनही सध्या बाजारात मालाची पुरेशी उपलब्धता नाही. कधी नव्हे ती एवढी दरवाढ झाल्यानंतर ग्राहकांसाठी चांदीची एखादी वस्तू विकत घेणे आता आवाक्याबाहेरचे झाले आहे.-विश्वास लुंकड (चांदीचे व्यापारी, जळगाव)