लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : भुजबळ कुटूंबियांनी भीतीचे वातावरण कधीही निर्माण केले नाही. आम्ही लोकांच्या जमिनी लाटत नाहीत. खोटी प्रकरणे टाकून कुणाला कारागृहात पाठवत नाहीत. दबावतंत्राचा उपयोग करीत नाहीत. असे सांगत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार सुहास कांदे यांच्यावर टिकास्त्र सोडले.

इगतपुरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी भुजबळ हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांनी सुहास कांदे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. काही वर्षांपूर्वी नाशिक हे भुजबळांमुळे दहशतीखाली वावरत होते, समीर भुजबळ यांनी मोठे गुंड पाळले होते, त्यामुळे नाशिककरांनी त्यांना तडीपार केल्याचा आरोप कांदे यांनी केला होता. कांदेंच्या आरोपांना समीर हे उत्तर देतील. न्यायालयाकडून आम्हाला कुठलीही नोटीस आलेली नाही. उलट महायुतीत एकत्र असतानाही वारंवार अपिलात जाऊन कांदे हे विरोधात काम करतात, हे त्यांनी स्वत: एकप्रकारे कबूल केल्याकडे छगन भुजबळ यांनी लक्ष वेधले. नांदगावमध्ये भीतीचे वातावरण आहे. न्यायालयातील अपिल मागे घेण्यासाठी पैशांचे अमिष दाखविल्याचा आरोप भुजबळांनी खोडला. कांदे हे कायम विमान प्रवास करतात. त्यांच्याकडे आमच्यापेक्षा जास्त पैसा आहे. आम्ही काय त्यांना अमिष दाखविणार, असा चिमटा भुजबळ यांनी काढला.

आणखी वाचा- दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुती आणि महाविकास आघाडीकडून जिल्ह्यातील काही जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. याबद्दलही भुजबळ यांनी मत व्यक्त केले. जिथे इच्छुकांची संख्या अधिक असते, तिथे बंडखोरीची शक्यता असते. तिथे बंडखोरी होऊ नये म्हणून उशिराने नावे जाहीर केली जात असल्याचे नमूद केले. शरद पवार यांच्या इतका राज्यातील मतदारसंघ आणि उमेदवारांचा कदाचितच कुणाचा अभ्यास असेल, त्यामुळे त्यांच्या पक्षाकडून बंडखोरी रोखण्यासाठी सावकाश निर्णय होईल. निफाडच्या जागेबाबत लवकर निर्णय होईल. या ठिकाणी केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी सर्व राजकीय पक्ष असे सर्वेक्षण करीत असल्याचे नमूद केले. जिथे पक्षाला खात्री असते तिथेही सर्वेक्षण होते. समोरील उमेदवार कोण, त्याच्यासमोर कोण प्रभावी लढत देईल, यासाठी वारंवार सर्वेक्षण होतात. असे भुजबळ यांनी सांगितले.