मालेगाव : शहराच्या मध्यवस्तीत पांझरापोळ संस्थेच्या जागेवर वर्षानुवर्षे सुरू असलेल्या नियमबाह्य लाकडी वखारी मानवी वस्ती आणि गोवंश जनावरांसाठी धोकादायक ठरत असल्याची तक्रार करीत त्या विरोधात पांझरापोळ संस्थेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह शास्त्री, सचिव संदीप भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन या वखारी तातडीने बंद कराव्यात, अशी मागणी केली आहे.
येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असलेल्या पांझरापोळ संस्थेकडून व्यावसायिकांनी काही वर्षांपूर्वी नाममात्र भाडेतत्वावर जागा पदरात पाडून घेतल्या. कालांतराने त्यातील काही व्यावसायिकांनी पोटभाडेकरू म्हणून अन्य व्यावसायिकांना या जागा परस्पर देऊन टाकल्या. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आणि नाममात्र भाड्याने मिळविलेल्या या जागा पोटभाडेकरूंना देताना घसघशीत भाडे आकारणी केली गेली. त्यामुळे काही लोकांच्या दृष्टीने पांझरापोळ संस्थेची जागा बक्कळ पैसा कमावण्याचे साधन झाले. गोवंश संवर्धनासाठी झटणाऱ्या पांझरापोळसारख्या सेवाभावी संस्थेला लुटण्याच्या या प्रकाराकडे पूर्वीच्या विश्वस्तांनी दुर्लक्ष केल्यामुळे संस्थेला वर्षानुवर्ष आर्थिक झळ सोसावी लागल्याचे शास्त्री आणि भुसे यांनी नमूद केले.
संस्थेच्या विश्वस्त मंडळांमध्ये बदल झाल्यानंतर दोन, तीन वर्षांपासून या परिस्थितीत बदल होत आहे, असा दावा उभयतांनी केला. कायदेशीर बडगा उगारल्यानंतर भाडेकरू आणि पोट भाडेकरूंचे धाबे दणाणले. काहींनी अनावश्यक जागा संस्थेला परत करून बाजारभावाप्रमाणे भाडे देणे सुरू केले. त्यामुळे लाकडी वखारी सुरु असलेल्या एक लाख चौरस फुट क्षेत्रापैकी जवळपास निम्मी जागा संस्थेला परत मिळाली. संस्थेच्या जागेवरील अन्य गाळेधारकांकडूनही नियमाप्रमाणे भाडे वसुली सुरू करण्याचे प्रयत्न असून भाडे कराराचा भंग करणाऱ्यांकडून जागा परत घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे शास्त्री आणि भुसे यांनी सांगितले.
संस्थेच्या जागेत ११ लाकडी वखारी आहेत. या ठिकाणी परिसरात मानवी वस्ती, जुने बसस्थानक, शहर पोलीस ठाणे, टपाल कार्यालय व अन्य खासगी आस्थापना आहेत. तसेच वखारींना लागून असलेल्या गो शाळेत किमान ५०० गोवंश आहेत. अशा ठिकाणी लाकडी वखारी असणे अत्यंत धोकेदायक आहे. आगीसारखी घटना घडल्यास येथे मोठा अनर्थ घडण्याची भीती आहे. त्यामुळे वन खात्याने या वखारींना कशी परवानगी दिली, असा प्रश्न निर्माण होतो. अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखला वा अग्निशमन परीक्षण करून घेतले जात नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी शास्त्री, भुसे यांनी केल्या. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन या वखारींचा परवाना रद्द करावा किंवा त्यांचे स्थलांतर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेस जवाहरलाल नानावटी, ब्रिजलाल बाहेती, पवन टिबडेवाल, नटवर दायमा आदी पदाधिकारी उपस्थित होते.