नाशिक – जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत मनमाड, नांदगावनंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने येवला या मंत्री छगन भुजबळ यांच्या गडातच त्यांना रोखण्याची तयारी केली आहे. त्यासाठी थेट महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला (शरद पवार) साथ दिली आहे. येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी नाट्यमय घडामोड झाली.

महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही परस्परविरोधी पक्षांनी शहर विकासाच्या नावाखाली एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला.

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे हे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत. त्यापैकी सुहास कांदे आणि मंत्री छगन भुजबळ तसेच माजी खासदार समीर भुजबळ या काका-पुतण्यांचे राजकीय वैर सर्वश्रृत आहे. नांदगाव विधानसभा निवडणूक प्रचारावेळीही सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यात वाद झाले होते. कांदे यांनी तर भुजबळ यांना बघून घेण्याची धमकी देण्यापर्यंत वाद गेला होता. त्यानंतर कांदे यांच्यामुळे भुजबळ यांनी शिवसेना शिंदे गटापासून दूर राहणेच पसंत केले.

नांदगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजपला आपल्याकडे वळविण्यात कांदे यांनी यश मिळविल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी या निवडणुकीत एकाकी पडली आहे. मनमाड नगरपरिषद निवडणुकीसाठीही शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र आले. या ठिकाणीही भुजबळ एकाकी असल्याचे दिसत आहे.

सोमवारी नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तर मंत्री छगन भुजबळ यांच्या गडातच त्यांना घेरण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली. या ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी “शहर विकासासाठी” असे कारण देत एकत्र येण्याची घोषणा केली.

शिंदे गटाकडून किशोर दराडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी युती होण्यासाठी प्रयत्न केले. आता भाजप -राष्ट्रवादीचा अजित पवार गट विरुद्ध शिवसेनेचा शिंदे गट- राष्ट्रवादीचा शरद पवार गट अशी लढत होउ शकेल. शरद पवार गट शिंदे गटाबरोबर गेल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाची अडचण झाली आहे.

एकंदरीत, महाविकास आघाडी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असताना छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात सुरु झालेले राजकीय वैर आता थेट नगरपरिषद निवडणुकांपर्यंत येऊन पोहचले आहे. येवला नगरपरिषद निवडणुकीत शहर विकासासाठी एकत्र येत असल्याचे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून सांगण्यात येत असले तरी त्यामागे भुजबळ यांना रोखण्याची व्यूहरचना असल्याचे मानले जात आहे. राजकारणातील मुरब्बी आणि अनुभवी मंत्री छगन भुजबळ आता या युतीला कसे सामोरे जातात, याची उत्सुकता आहे.