नोटाबंदीमुळे एपीएमसीतील बहुतांश व्यवहार उधारीवर

चलनटंचाईचा मोठा फटका तुर्भे येथील एपीएमसी बाजाराला बसला आहे. साठ टक्के व्यापार हा उधारीवर सुरू असल्याने घाऊक बाजार कोलमडला आहे. बाजारात येणाऱ्या शेतमालाला म्हणावा तसा उठाव नसल्याने उधारी देण्याशिवाय व्यापाऱ्यांसमोर पर्याय शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी व्यापार कमी केला आहे.

[jwplayer xpbAHLf3]

थंडीचे दिवस सुरू झाल्याने भाज्या, फळे, कांदा बटाटा यांचे चांगले उत्पादन येत आहे. हा शेतमाल घाऊक बाजारपेठेत पाठविण्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही. त्यामुळे नवी मुंबईतील घाऊक बाजारपेठेत शेतमालाची आवक मोठी आणि मागणी कमी आहे. त्यात किरकोळ विक्रेते जुन्या नोटा घेऊन शेतमाल खरेदी करण्यासाठी येत असल्याने त्या नोटा घेऊ नका असे पत्रक घाऊक बाजारपेठ संघटनांना काढावे लागले आहे. जुन्या नोटांऐवजी उधारीवर शेतमाल देण्यावर व्यापाऱ्यांचा कल असून काही जणांनी व्यापारच कमी केला आहे. त्यामुळे शेतमाल कमी मागविला जात आहे.

बाजारात शेतमाल येत आहे, पण त्याला उठाव नाही. व्यापार कमी झाला आहे. जुन्या नोटा घेण्याऐवजी तीन महिने उधारीवर माल दिला जाणार आहे, असे  फळ व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले.

कांदा, बटाटा, लसणाचा घाऊक बाजार ३० ते ३५ टक्के उधारीवर चालतो. त्यामुळे थोडा रोख, थोडा उधार असा हा व्यवहार सुरू आहे. वाहतूकदारांची मोठी अडचण होत असल्याने त्यांना परतीच्या प्रवासासाठी चलनात असलेल्या काही नोटा व्यापारी देत आहेत. येत्या काळात हा व्यापार सुरुळीत होईल अशी अपेक्षा आहे.

– अशोक वाळुंज, कांदा बटाटा लसूण बाजार, एपीएमसी.

[jwplayer eW0sv8sU]