सिडकोचे नवे व्यवस्थापकीय संचालक; नेरुळ-उरण रेल्वे, नवी मुंबई मेट्रोचीही धुरा

नवी मुंबई : सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झालेले लोकेशचंद्र यांच्यापुढे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रातील ग्रामस्थांचे स्थलांतर हे मोठे आव्हान असणार आहे. याशिवाय नेरुळ-उरण रेल्वे, नवी मुंबई मेट्रो आणि पंधरा हजार घरांचा प्रकल्पदेखील महत्त्वाचा ठरणार आहे.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प मार्गी लागावा यासाठी ज्येष्ठ सनदी अधिकारी संजय भाटिया व भूषण गगराणी यांची सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचा भूमिपूजन सभारंभदेखील मोठय़ा धूमधडाक्यात झाला.

या प्रकल्पात आता प्रकल्पग्रस्तांचे संपूर्ण स्थलांतर हा प्रश्न महत्त्वाचा असून नवीन व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांच्या पुढे हे आव्हान असणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केंद्र व राज्य सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी १० गावांतील ६७१ हेक्टर जमीन संपादित करणे आवश्यक होते. ते काम माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी विनाअडथळा पार पाडले, मात्र हे भूसंपादन केवळ कागदोपत्री होते. छोटय़ा-मोठय़ा मागण्या मंजूर करणे, स्थलांतरासाठी प्रवृत्त करण्याचे काम जिकिरीचे होते.

पाहिल्या दीड वर्षांत भाटिया यांच्या जागी आलेले भूषण गगराणी यांनी ही जबाबदारी लीलया पेलली. विशेष म्हणजे २० वर्षे चर्चेत असलेल्या विमानतळाचा भूमिपूजन सभारंभ यंदा पार पडला. त्याच वेळी १६ हजार कोटी रुपये खर्चाच्या कामाची निविदा मुंबई विमानतळाचा कायापालट करणाऱ्या जीव्हीके कंपनीला देण्यात आली.

या कंपनीला गाभा क्षेत्र हस्तांतरित करण्यापर्वी दोन हजार कोटी रुपयांची विमानतळपूर्व कामे चार कंत्राटदारांना वाटून देण्यात आली आहेत. ही प्रक्रिया गगराणी यांच्या काळात पूर्ण झाली. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळप्रसंगी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही गळ घातली होती. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर आता अंतिम टप्प्यात आले आहे. एक हजार प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर केले असून या महिनाअखेर दोन हजार प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर होणे अपेक्षित आहे.

गाव जमीनदोस्त करण्याची मोठी जबाबदारी नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांच्यावर आहे. हे काम महत्त्वाचे असून पावसाळ्यापूर्वी या प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर होणे आवश्यक आहे. या विमानतळाचे ११६१ हेक्टर गाभा क्षेत्र व उलवा टेकडी उंची कमी करणे ही महत्त्वाची कामे डिसेंबरअखेपर्यंत करणे आवश्यक आहे. त्यानंतर मुख्य बांधकाम कंपनी आपल्या कामाला सुरुवात करणार आहे.

खारकोपपर्यंत सुरू होणारी नेरुळ उरण रेल्वे, नवी मुंबई मेट्रो, आणि खारघर सेक्टर ३६ येथे उभा राहणारा १५ हजार घरांचा प्रकल्प पूर्ण करण्याचे मोठे काम लोकेशचंद्र यांच्यावर आहे.