पनवेल, एरोलीतील पथकांना मोठी मागणी

सांस्कृतिक नगरी मानल्या जाणाऱ्या पुण्यापर्यंत मर्यादित असलेल्या ढोलपथकांचा विस्तार आता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या नगरांसह राज्यातील प्रमुख नगरीत होत असून नवी मुंबईत गुरुवारी होणाऱ्या श्री विसर्जनाच्या वेळी ऐरोली, वाशी, नेरुळ, तुर्भे या प्रमुख उपनगरांत ढोलांचा नाद गुंजणार आहे. महामुंबईत सध्या पाच ढोल पथके धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आकर्षण ठरू लागले आहेत. ऐरोलीतील नादगर्जा तर पनवेलमधील नादब्रह्म ढोलपथकाला तर गणेश आगमनापासून विसर्जनापर्यंत नवी मुंबई, मुंबईत मोठी मागणी आहे. परांपरागत कलासंस्कृतीचा आविष्कार असलेल्या या पथकांना विविध कार्यक्रमांसाठी चांगले मानधन मिळत आहे.

राज्यात ३५० ढोलपथके असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून केवळ पुण्यात यातील अर्धे ढोलपथके कार्यक्रमांची रंगत वाढवत आहेत. मात्र आता मुंबई, नवी मुंबई ठाण्यातही अशी पथके तयार होऊ लागली असून गेली तीन ते चार महिने दर रविवारी सराव करून नवी मुंबईतील ढोल पथके गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाली होती. श्री आगमन, दीड, पाच व आता दहा दिवसांच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत या ढोलपथकांचा कस लागणार आहे. ऐरोली येथील नादगर्जा पथक गुरुवारी सेक्टर चार मधील सार्वजनिक गणेशोत्सवाची मिरवणूक मोठय़ा धूमधडाक्यात ऐरोलीतून वाजत गाजत नेणार आहे. नादगर्जाच्या पथकात गुरुवारी १४० तरुण-तरुणी सहभाग घेणार आहेत. वाजवण्यासाठी ४० ढोल, १२ ताशे, एक टोल बेल, सहा ध्वज आणि दोन शंख असतील. सर्कल वा चौकात लोकांचा उत्साह पाहता हा ताल अधिक रंगवला जाणार आहे. शिव तांडव, वक्रतुंड महाकाय, भीमरूपी महारुद्र, वारकरी संप्रदायचे जय हरी विठ्ठल, तर नवरात्रोत्सवात प्रसिद्ध असलेला गरबा तालावर हे ढोल वाजवताना या पथकाचा उत्साह टिपेला जात असल्याचे जाणवत आहे. सार्वजनिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून ढोल पथकांना आमंत्रित करणाऱ्या संस्थांना सवलत देत असल्याचे नादगर्जाच्या वतीने सांगण्यात आले.

पथकात असलेले सर्व तरुण हे सुशिक्षित, सुसंस्कृत आणि आर्थिकदृष्टय़ा सुस्थितीत आहेत. सर्व तालधारक चांगल्या नोकरी धंद्यात कार्यरत असून शासकीय नोकरी, आयटी क्षेत्रातील तरुणांनाही गळ्यात ढोल अडकवण्यास कमीपणा वाटत नाही. अलीकडे कोपरखैरणे येथील एक महिला पोलिस अधिकारींनी नादगर्जाच्या पथकात सहभाग घेतला आहे. पनवेलमध्ये शौय, ब्रह्मा, स्वरगर्जना, नादस्फूर्ती, युवानंद, घंटानाद, मी मराठी या ढोलपथकांनीही विसर्जनाची जोरात तयारी सुरू केली आहे.