मेट्रोला दिवाळीचा मुहूर्त; मुंबईत जाण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय; महामार्गाचे काँक्रीटीकरण पूर्ण होणार

टीम नवी मुंबई</strong>

नवी मुंबईतील नागरिकांचे जगणे किमान सुसह्य़ करू पाहाणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ नव्या वर्षांत होईल, अशी सुचिन्हे जुन्या वर्षांला निरोप देताना दिसू लागली आहेत.  गेली पाच वर्षे रखडलेली नवी मुंबई मेट्रो यंदा सहा महिने उशिरा का होईना दिवाळीपर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेरुळ ते भाऊचा धक्का ‘रो-रो’ सेवा जूनअखेपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. तर शीव पनवेल महामार्गावरील उर्वरित कामे मार्चपर्यंत पूर्ण होणार असून या मार्गावरील वाहनांचा वेगही वाढणार आहे. याबरोबरच शहरातील भविष्याच्या नियोजनाचा आराखडा तयार करणारा पालिकेचा विकास आराखडयाला यंदा राज्य शासनाचा हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई : गेली पाच वर्षे रखडलेली नवी मुंबई मेट्रो यंदा सहा महिने उशिरा का होईना दिवाळीपर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेमध्ये मेट्रो सुरू करण्याचे आश्वासन सिडकोच्या वतीने दिले होते, मात्र काही तांत्रिक कामे पूर्ण करण्यास आणखी पाच ते सहा महिने लागणार असल्याने ही सेवा या वर्षांअखेर सुरू करण्याचा सिडकोचा प्रयत्न राहणार आहे.

या मेट्रोच्या डब्यांची चाचणी विधानसभा निवडणुकीअगोदर घेण्यात आली आहे. साडेआठ हजार कोटी रुपये खर्च करून सिडको २६ किलोमीटर अंतराचे मेट्रो जाळे दक्षिण नवी मुंबईत उभे करणार आहे.

दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनच्या मार्गदर्शनाखाली सिडको नवी मुंबईच्या दक्षिण भागात मेट्रोचे पाच मार्गे तयार करीत आहे. त्यातील बेलापूर ते पेंदार या ११ किलोमीटर अंतराचे काम गेली पाच वर्षे रखडलेले आहे. आघाडी सरकारच्या काळात मे २०११ मध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या तीन ते चार वर्षांत या मार्गातील बेलापूर ते पेंदार हा मार्ग सुरू करण्याचे आश्वासन सिडकोने शुभारंभाच्या कार्यक्रमात देण्यात आले होते, मात्र त्यानंतर विविध कारणास्तव हा प्रकल्प पाच वर्षे रखडला आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या कामामुळे या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले. नवी मुंबई मेट्रो मार्गाच्या उभारणीतील कंत्राटदाराचा वाद थेट न्यायालयापर्यंत गेल्याने या प्रकल्पाला अधिक विलंब लागला आहे. तळोजापर्यंत जाणारी ही मेट्रो एमआयडीसीने औद्योगिक वसाहतीपर्यंत नेण्याची मागणी सिडकोकडे केली आहे. त्यामुळे पावणे चार किलोमीटर अंतराचा हा मार्गे वाढला असून सिडको व एमआयडीसी संयुक्त हा मार्ग उभारणार असून यावर सातशे ते आठशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हीच मेट्रो पुढे कल्याण डोंबिवलीपर्यंत जाणार आहे.

नैना व औद्योगिक नगरीला चालना देण्यासाठी या प्रकल्पाच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. बेलापूर ते पेंदार या मार्गातील व्हायडक्ट व मेट्रो पुलांची कामे झालेली आहेत. केवळ स्टेशन आणि सिग्नलिंगची कामे शिल्लक आहेत. सुरक्षा आयुक्तांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता महत्त्वाची आहे.

काही तांत्रिक कारणास्वत या वर्षी मे महिन्यात सुरू करण्यात येणारी नवी मुंबई मेट्रो सेवा दिवाळीपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे. दक्षिण नवी मुंबईत या सेवेचे पाच मार्ग आहेत.

– लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको.