पनवेल-मुंब्रा मार्गावरील कळंबोलीनजीक लोह पोलाद बाजाराजवळील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही तो वाहतुकीसाठी ‘एमएमआरडीए’कडून सुरू होत नव्हता. येथील नागरिकांनी बुधवारी या पुलाचे अनौपचारिक उद्घाटन करीत तो वाहतुकीसाठी खुला केला आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीने त्रस्त होऊन नागरिकांनी तो खुला केला असून आज यामुळे वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळाला.

कळंबोली लोह पोलाद बाजार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व उरण येथे जाणारा जेएनपीटी मार्ग यांना जोडणारा हा रस्ता आहे. या उड्डाणपुलाचे काम गेली दीड वर्षे सुरू होते. या मार्गावरून अवजड वाहतूक होत असल्याने मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. यामुळे कळंबोली व आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना याचा त्रास होत होता. याला

कंटाळून नागरिकांनी या पुलाचे अनौपचारिक उद्घाटन केले. त्यामुळे या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

उड्डाणपूल तयार असूनदेखील तो सुरू करण्यात येत नव्हता. गेली दीड वर्षे वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे नागरिकांनी तो खुला केला असून वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका मिळाली आहे.

– रवींद्र भगत, नगरसेवक