निम्मा खर्च मिळाल्याखेरीज पूल उभारण्यास पालिकेचा नकार

नवी मुंबई : वाशीतील अरेंजा कॉर्नर ते कोपरी गावापर्यंत उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा प्रकल्प प्रशासकीय यंत्रणांतील टोलवाटोलवीमुळे रखडण्याची चिन्हे आहेत. या पुलासाठी जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यातील निम्मा खर्च सिडकोने करावा, अशी अपेक्षा नवी मुंबई महापालिकेने व्यक्त केली आहे. सिडकोकडून पावणेदोनशे कोटींचा निधी मिळाल्याखेरीज या पुलाच्या कामाचे आदेश न देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अभियंता विभागाला केल्या आहेत. या निधीसाठी पालिकेने सिडकोशी पत्रव्यवहारही केला आहे.

नवी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्रीकरण करण्यासाठी महापालिकेने काही प्रकल्प आखले आहेत. तसेच शहरातील मोक्याच्या ठिकाणांचा अभ्यास करून ३६ अपघात प्रवणक्षेत्र निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी पामबीच मार्गाचा भाग असलेल्या वाशीतील अरेंजा कॉर्नर ते कोपरी गावापर्यंतच्या रस्त्यावरील वाढती वर्दळ आणि अपघात यांच्या पार्श्वभूमी वर पालिकेने येथे उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आखला आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून सर्वात कमी दराची ३२६ कोटी खर्चाची निविदा आली आहे, मात्र हा खर्च संपूर्णपणे करणे पालिकेला शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. करोनाकाळात विविध आरोग्य उपाययोजनांवर पालिकेचे शंभर कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च झाले असून पालिकेच्या तिजोरीला ओहोटी लागली आहे.  त्यामुळे अरेंजा कॉर्नर ते कोपरी या पुलासाठी ३२६ कोटी रुपयांचा देकार आल्याने पालिकेने सध्या या निविदेचे कार्यादेश दिलेले नाहीत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत पालिकेने शहरातील मोठय़ा प्रकल्पांसाठी सिडकोने आर्थिक मदत करावी, असा प्रस्ताव मांडला आहे. पालिका क्षेत्रातही    सिडकोचे अनेक भूखंड विक्रीविना पडून असून पालिकेच्या पायाभूत सुविधांमुळे या भूखंडांना चांगली किंमत येत असल्याची भूमिका पालिकेने मुख्यमंत्र्यांकडे मांडलेली आहे. अशावेळी श्रीमंत महामंडळाने पालिकेला आर्थिक मदत

करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी सिडकोला केल्या आहेत. त्यामुळे घणसोली ते ऐरोली या पामबीच विस्तार मार्गासाठी सिडकोला पालिकेला २५ कोटी रुपये देण्यास संचालक मंडळाची मंजुरी दिली आहे. या खाडीपुलासाठीही पालिकेला अर्धा खर्च सिडकोकडून हवा आहे, पण सिडकोने २५ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवून पालिकेला तुटपुंजी मदत केली आहे. सिडकोची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे. त्यामुळे पामबीच विस्तारात सिडकोचे अनेक भूखंडांना चांगली किंमत येणार असल्याने सिडकोने ही आर्थिक मदत केली आहे, पण शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सिडको या अरेंजा कॉर्नर ते कोपरी गाव या उड्डाणपुलासाठी अर्धा खर्च अर्थात पावणेदोनशे कोटी रुपये देण्यास तयार होणार नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. पालिकेनेही सिडको अर्धा खर्च देत नाही तोपर्यंत या कामाचे कार्यादेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाशीतील या उड्डाणपुलाचे भवितव्य हे सिडकोच्या आर्थिक मदतीवर अवलंबून राहणार आहे.