नवी मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून उठविण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर ठाणे-बेलापूर व शीव-पनवेल महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक वाढल्याने या महामुंबई क्षेत्रातील प्रदूषण पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईतील पीएम २.५ पातळी ही २७.२पर्यंत वाढली असल्याचे दिसून आले आहे.
गेली सहा महिने ठप्प असलेली वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने ही पातळी वाढल्याचे प्रदूषण नियंत्रण विभाागाने म्हणणे आहे. टाळेबंदीच्या काळात महामुंबईतील प्रदूषण कमालीचे कमी झाले होते. आता गेली दोन दिवस शहरात प्रदूषणाचे धुरकेदेखील दिसून येऊ लागले आहे.
नवी मुंबईतून शीव-पनवेल आणि ठाणे-बेलापूर हे दोन वर्दळीचे मार्ग जात असल्याने या भागातील प्रदूषणाची पातळी वाढत असल्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वीच जाहीर केले आहे. तळोजा एमआयडीसीतील काही रासायनिक कारखाने आणि नवी मुंबई विमानतळासाठी सुरू असेलेले उलवा टेकडी उत्खन्नाने या प्रदूषणात भर पडलेली आहे. यातच महामार्गावरील दिवसाला होणाऱ्या लाखो वाहनांच्या वाहतुकीमुळे या प्रदूषणात भर पडली आहे. टाळेबंदी उठल्यानंतर हे प्रदूषण पूर्ववत होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण विभाग अधिकारी डी. बी. पाटील यांनी सांगितले.