परतीच्या पावसाने रस्त्यांची प्रचंड दुरवस्था

नवी मुंबई</strong> : परतीच्या पावसाने ‘एमआयडीसी’तील अंतर्गत रस्त्यांवर डाबंरही शिल्लक राहिले नसून रस्ते दगड-गाठय़ांचे झाले आहेत. मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त असून वाहनांच्या देखभाल दुरुस्तीसह आरोग्याचेही प्रश्न निर्माण झाले आहेत.

आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी असताना या ठिकाणच्या सुविधांबाबत नेहमीच ओरड आहे. रस्त्यांबाबत एमआयडीसी व पालिका दोन्ही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने खूप वाईट अवस्था झाली आहे. दरवर्षी किरकोळ डागडुजी केली जात असून पावसात हे रस्ते वाहून जात आहेत. पुन्हा तीच अवस्था होत असल्याने अंतर्गत रस्ते हे आता दगड गोठय़ांचे उरले आहेत.

यावर्षी झालेल्या पावसात या रस्त्यांची दुरवस्था झाली. गेल्या आठवडय़ात झाल्याने परतीच्या मोठय़ा पावसाने तर रस्त्यांवर डांबरच शिल्लक ठेवले नाही. ठिकठिकाणी डबकी तयार झाली असून खडी सर्वत्र पसरली आहे. वाहनचालकांना दिवसा वाहन चालवणे कठिण होत आहे. रात्रीच्या वेळी तर जीव धोक्यात घालून  परतावे लागत आहे. अंतर्गत रस्त्यांवरून मुख्य रस्त्यावर गेल्यानंतर वाहनचालक सुटकेचा नि:श्वास सोडत आहेत. अनेक लहान-मोठे अपघातही यामुळे होत आहेत. वाहनांच्या देखभालीवर खर्च वाढला असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. महापे व शिरणे एमआयडीसीत तर अत्यंत वाईट अवस्था आहे.

औद्योगिक वसाहतीत १०० किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यात २१ किलोमीटरचे काम सध्या सुरू आहे तर १५ किलोमीटरचे काम नवी मुंबई मनपा करणार आहे. शिरवणे वसाहतीतील रस्त्यांच्या कामांबाबत निविदा प्रक्रिया सुरू आहे.

-एम.एस. कळकुटकी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी.

‘एमआयडीसी’त प्रवास ही एक जीवघेणी कसरत आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी डांबरही वाहून गेल्याने खडीच्या रस्त्यांवर वाहन घसरण्याचा धोका हा असतोच. शिवाय अशा रस्त्यांमुळे पाठीचे विकार वाढण्याचा धोका वाढला आहे.

दिपक डुंबरे, डोंबिवली.