१४ हजारांहून अधिक मूर्तीचे विसर्जन
नवी मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रात पाच दिवसांच्या गणरायाला गौरीसह सोमवारी भक्तीमय वातावरणात आणि जल्लोषात निरोप देण्यात आला. दुष्काळ दूर करून पावसाचा वर्षांव करण्याचे साकडे गणरायाला करत अनेक ठिकाणी विविध सामाजिक विषयाचा जागर करण्यात आला. नवी मुंबईत पालिकेच्या हद्दीत गणेश विसर्जनासाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. संध्याकाळी उशिरापर्यत सार्वजनिक आणि घरगुती अशा १४ हजारांहून अधिक मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
दिघा तलावापासून ते सीबीडीपर्यंत असणाऱ्या तलावांमध्ये श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले तर वाशी येथील सागर विहार, ऐरोली जेटी, दिवाळे गाव, सानपाडा जेटी, बामणगवळी घाट, ऐरोली, घणसोली, कोपरखरणे, नेरुळ, रबाले आदी तलावांमध्ये श्री गणरायाचे विर्सजन करण्यात आले. दिवा गाव सानपाडा गाव, करावे गाव, दिवाळे गाव येथील आगरी कोळी बांधवांनी गौरीचे विधिवत पूजन केले अणि गणरायासह सोमवारी तिचे विसर्जन केले. महापालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी विशेष व्यवस्था राखण्यात आली होती. गणेश घाटावर सुरक्षा मार्गदर्शक त्याचबरोबर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते, तर अग्निशामक दलाचे पथक, आरोग्य व्यवस्था विद्युत विभाग रात्री उशिरापर्यंत कार्यरत होता. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रभाग कार्यालयातील आधिकारी वर्गाबरोबरच नवी मुंबई पोलिसांचा खडा पहारादेखील विर्सजन घाटावर पाहावयास मिळाला. पोलिसांची बीट मार्शल व्यवस्था चोखपणे तैनात होती. पोलीस आयुक्त प्रभांत रंजन, पोलीस उपआयुक्त यांचे पथक शहरातील विविध गणेश विसर्जन घाटांवर पाहणी करत होते.

कृत्रिम तलाव नसल्याने नाराजी
नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या तलावांमध्ये विसर्जनासाठी स्वतंत्र बांध घातला आहे. या ठिकाणी सर्व मूर्तीचे विसर्जन केले जाते. परंतु तलावाच्या व्यतिरिक्त स्वतंत्र कृत्रिम तलाव नसल्याने पर्यावरणप्रेमी तसेच गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली. पुढील वर्षी तरी गणेश मूर्ती दान केंद्र आणि कृत्रिम तलाव उभारण्याची मागणी गणेशभक्तांनी केली आहे.