News Flash

उजाड डोंगरांवर वनीकरण

नवी मुंबईच्या पूर्वेस दिघा ते बेलापूर या २८ किलोमीटर क्षेत्रफळात पारसिक डोंगर आहे.

एका करारानुसार सुलाई देवी, मुंब्रादेवी आणि गवळीदेव डोंगरांवर पर्यटनस्थळ निर्माण करण्यात येणार आहे.

नवी मुंबई महापालिकेचा पुढाकार; वनविभागाशी करार

नवी मुंबईतील डोंगरांवर वनीकरण आणि सुशोभीकरण व्हावे, यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करणाऱ्या महापालिकेची मागणी अखेर राज्य शासनाच्या वनविभागाने मान्य केली आहे. एका करारानुसार सुलाई देवी, मुंब्रादेवी आणि गवळीदेव डोंगरांवर पर्यटनस्थळ निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठीचा निधी पालिका वृक्षप्राधिकरण समितीच्या माध्यमातून खर्च करणार आहे. सह्य़ाद्रीच्या रांगांचा एक भाग असलेल्या या पारसिक डोंगरावर मोठय़ा प्रमाणात वृक्षसंवर्धन झाल्यास टीटीसी औद्योगिक पट्टय़ामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणाम काही प्रमाणात कमी करता येतील, असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.

नवी मुंबईच्या पूर्वेस दिघा ते बेलापूर या २८ किलोमीटर क्षेत्रफळात पारसिक डोंगर आहे. राज्यात अनेक ठिकाणी सामाजिक वनीकरणाची मोहीम सध्या सुरू आहे. रेल्वेच्या अखत्यारीत असलेले दिघा येथील ब्रिटिशकालीन धरण वनविभागाकडे वर्ग करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने दाखविली आहे. त्यामुळे या धरणक्षेत्रात राज्य सरकारकडून वनीकरण केले जाणार आहे. याच धरणाच्या दक्षिण बाजूस असलेले रबाळे येथील मुंब्रा देवी, सुलाई देवी घणसोली येथील गवळी देव क्षेत्र हे वनविभागाकडे आहे. सुमारे एक हजार एकरांपेक्षा जास्त वनक्षेत्र असलेल्या या भागात पावसाळ्यात चांगलीच वनसंपदा निर्माण होते, मात्र उन्हाळ्यात हे डोंगर अक्षरश: ओसाड दिसून येतात. पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या तयार होणारा गवळीदेव धबधबा तर अनेक पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. गवळीदेव डोंगराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी तो पालिकेकडे देण्यात यावा, अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी पाच वर्षांपासून लावून धरली आहे. मात्र वनविभागाने हे क्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून देण्यास फारशी उत्सुकता दाखविली नव्हती.

महापौर सुधाकर सोनावणे यांच्या प्रभागाला लागून असलेल्या सुलाई देवी डोंगरावर त्यांच्या प्रयत्नाने गेली १० वर्षे वृक्षलागवड केली जात आहे. वड, पिंपळापासून ते सीताफळ बोरांपर्यंत २५ हजार झाडांची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याच भागात जाई-जुई, सदाफुली आणि आबोलीची फुलझाडे देखील लावण्यात आली आहेत. उन्हाळ्यात या झाडांना पाणी मिळावे, यासाठी डोंगराच्या पायथ्याशी पाच कोटी लिटर क्षमतेचा कृत्रिम तलाव बांधण्यात आला आहे. नुकतीच या वनक्षेत्राला ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी भेट दिली. त्यावेळी वनविभागाच्या ताब्यात असलेले हे क्षेत्र नवी मुंबई पालिकेकडे वनीकरणासाठी देण्याची तयारी वन विभागाने दाखविली आहे. सुलाई देवी मंदिर व गवळीदेव परिसरही पालिकेला वर्ग करण्याची तयारी वन विभागाने दर्शवली. ८ जूनला बैठक पार पडली असून लवकरच करार करून हे वनक्षेत्र टप्प्याटप्प्याने पालिकेकडे वनीकरणासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे.

नवी मुंबईच्या पूर्वेस दिघा ते बेलापूपर्यंत असलेल्या डोंगररांगा वनीकरणासाठी पालिकेच्या ताब्यात देण्यात याव्यात, अशी मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे. त्या निमित्ताने शहरात काही पर्यटन स्थळे निर्माण करता येऊ शकतील. नवी मुंबई पालिकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याने या क्षेत्रात लागणाऱ्या पायाभूत सुविधाही निर्माण करता येऊ शकतात. त्याला वनविभागाने आता अनुकूलता दर्शविली आहे.

– सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2017 3:27 am

Web Title: nmmc developed garden on parsik range for tourist attraction
Next Stories
1 पनवेल महापालिकेतर्फे वाहनतळ उभारणी
2 उलवा टेकडीचे सपाटीकरण शुक्रवारपासून
3 पांडवकडय़ावर यंदाही पर्यटकांना प्रवेशबंदी
Just Now!
X