प्रशासनाकडून प्राधान्यक्रमाने यादी तयार करण्याचे काम

नवी मुंबई : करोना लस दृष्टिक्षेपात येत असल्याने ती देण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्याचे काम पालिका पातळीवर सुरू झाले असून आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रथम लस दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांची यादी तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागात दोन हजारांपेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचारी असून साफसफाई कामगारांना देखील यात सामावून घेतले जाणार आहे. राज्य शासनाने या संर्दभात काही मार्गदर्शकतत्त्व घालून दिली आहेत. डिसेंबरमध्ये देशात करोनावर लस येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबईतील करोना रुग्णांची संख्या पन्नास हजारांच्या जवळपास पोहचली आहे. गेली सात महिने पालिकेची आरोग्य यंत्रणा या साथ रोगाचा सामना करण्यासाठी झटत आहे. सध्या करोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी ती डिसेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येला लागणारी यंत्रणा पालिकेने उभारली असून जास्तीत जास्त अत्यवस्थ रुग्णांना रुग्णशय्या तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच काळात करोनावरील लसीचा शोध लागण्याची शक्यता असून देशात ही लस डिसेंबरमध्ये वितरित होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्य शासनाच्या आदेशाने या लसीबाबत प्राधान्यक्रम ठरविला असून आरोग्य कर्मचारी व डॉक्टर यांना ही लस सर्वात अगोदर दिली जाणार आहे. यात परिचारिका यांनी गेली सात महिने जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली आहे. त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. यानंतर सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांना ही लस दिली जाणार असून साफसफाई कर्मचारी व पोलीस यांचा विचार केला जाणार आहे. आरोग्य यंत्रणेत खासगी रुग्णालये, डॉक्टर यांचाही विचार केला जाणार आहे.

नवी मुंबईत ११२ नवे करोनाबाधित

नवी मुंबईत गुरुवा्ररी ११२ नवे करोनाबधित आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या ४५ हजार १४३ झाली असून मृतांची संख्या ९१५ इतकी झाली आहे. एकूण २,९१,८८७ जणांच्या करोना चाचण्या  करण्यात आल्या आहेत. गुरुवारी १६६ जन करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ४२ हजार ६९७  रुग्ण बरे झाले आहेत. १ हजार ५३१ रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनावर लसीची लवकरच प्रतीक्षा संपणार आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारने सर्वच शासकीय यंत्रणांना प्राधान्यक्रम ठरविण्याचे आदेश दिले असून आरोग्य विभाग यात पहिला आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्व आरोग्य घटक तसेच खासगी डॉक्टरांची यादी प्राधान्य ठरविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. – अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका