News Flash

स्वीकृत नगरसेवकपदावरून शेकापमध्ये बंड

संदीप पाटील यांनी महापालिकेच्या निवडणुकीत पराजयानंतर पक्षाचे कोणतेही काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

पनवेल महापालिका

पदासाठी विचार न झाल्यामुळे संदीप पाटील नाराज

पनवेल पालिकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) आता स्वपक्षातील नाराजांच्या बंडाला तोंड द्यावे लागत आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी शेकापच्या नेत्यांनी काही कार्यकर्त्यांना विचारात न घेतल्यामुळे त्यांनी बंड केले आहे. शेकापसोबत ३० वर्षांपासून असलेल्या आणि पनवेल नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदापर्यंत मजल मारलेल्या संदीप पाटील यांनी महापालिकेच्या निवडणुकीत पराजयानंतर पक्षाचे कोणतेही काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्ष विरुद्ध संदीप पाटील, असा सामना पनवेलमध्ये रंगला आहे.

पनवेल पालिकेच्या निवडणुकीत जे शेकापचे हक्काचे प्रभाग मानले जात होते, अशाही काही प्रभागांत शेकापला मोठा पराभव सहन करावा लागला. या पाश्र्वभूमीवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी कामोठे येथील प्रमोद भगत आणि खारघरमधील गुरुनाथ गायकर यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्यात आली. त्यामुळे हा वाद सुरू झाला आहे.

नवीन पनवेल येथील संदीप पाटील, तक्का येथील सुनील बहिरा, अजय कांडपिळे तसेच कामोठे येथील के. के. म्हात्रे, राजेश म्हात्रे यांचा पालिका निवडणुकीत हमखास विजय होईल या विचाराने शेकापचे नेते निश्चिंत होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे शेकापच्या नेत्यांनी मतदारांनी दिलेला कौल ग्राह्य़ धरून पनवेल पालिकेच्या सभागृहात नवीन चेहऱ्यांना संधी दिली; मात्र संदीप पाटील यांनी स्वीकृत नगरसेवक पदावर वर्णी न लागल्यामुळे शेकापच्या बडय़ा नेत्यांसमोर नाराजी व्यक्त केली. त्यांनी आपल्या नवीन पनवेल येथील पक्ष कार्यालयासमोरील शेकापचे फलक काढून त्याजागी स्वत:च्या नावाची ओळख सांगणारे फलक लावले आहेत. यावेळी पक्षातील इतर नाराजांनीही आपल्याशी संपर्क साधल्याची माहिती संदीप पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

शेकापमध्ये साफसफाई

शेकापच्या बडय़ा नेत्यांनी यावर बोलणे टाळले; स्वीकृत नगरसेवक पदासाठी दोन नवे चेहरे देणे ही प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत  काढण्याची खेळी असल्याची चर्चा शेकापच्या गोटात आहे. पक्षापेक्षा पदाविषयी जास्त निष्ठा असणाऱ्यांना दूर ठेवणारी साफसफाई मोहीम शेकापमध्ये राबवण्यात येत असल्याची चर्चा आहे. पनवेल नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद संदीप पाटील यांच्याकडे पाच वर्षे होते, तरीही मतदारांनी पाटील यांना का नाकारले, याचा जाब पक्षाने विचारलेला नाही. त्यामुळे बडे नेते काम थांबवून घरी बसले तरीही कार्यकर्ते पक्ष चालवतील, अशा प्रतिक्रिया पक्षाच्या बडय़ा नेत्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 4:01 am

Web Title: nominated corporators post issue create dispute in shetkari kamgar paksh
Next Stories
1 बस आगाराची वाट सुकर
2 बालकांच्या पोषण आहारात किडे
3 शहरबात-उरण : महामार्गात खड्डेविघ्न
Just Now!
X