कामांसाठी खोदलेल्या खड्डय़ांचे ‘तलाव’
(सीमा भोईर )पनवेल : पनवेल रेल्वे स्थानकाच्या फलाटांचे काम वेळेत पूर्ण करण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरले आहे. या स्थानकात बांधण्यात येत असलेल्या दोन नव्या फलाटांसाठी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत, मात्र काम अर्धवट असल्याने पावसाचे पाणी त्या खड्डय़ांत साचून त्यांना तलावाचे रूप आले आहे. मार्च २०१७ पासून सुरू असलेले काम अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही.
जेएनपीटी बंदरातून होणारी मालवाहतूक दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ आणि ४ राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकल ट्रेनसाठी अतिरिक्त दोन फलाट बांधण्यात येत आहेत. हे फलाट पनवेल स्थानकाच्या जुन्या पनवेलच्या दिशेकडील भागात बांधण्यात येत आहेत. त्यामुळे फलाटांचा क्रम बदलणार आहे. नवे फलाट १ व २ क्रमांकाचे असतील आणि सध्याच्या १ व २ क्रमांकाच्या फलाटांना ३ आणि ४ क्रमांक देण्यात येतील.
ज्या जागेत फलाट बांधण्यात येणार आहेत, तेथील रेल्वेची कार्यालये पाडण्यात येतील. पाचमजली इमारतीत या कार्यालयांना जागा देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तो पूर्णपणे रेल्वेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या बदलांमुळे रेल्वे स्थानकात आमूलाग्र बदल होणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रायगड जिल्ह्य़ातील पनवेल हे पहिले अत्याधुनिक स्थानक म्हणून गणले जाणार आहे, अशी माहिती तत्कालीन स्थानक अधिकारी बी. के. गुप्ता यांनी दिली होती, मात्र प्रत्यक्षात कामे संथ गतीने होत आहेत. त्यामुळे प्रवाशांची आणि रेल्वे स्थानक परिसरातील रहिवाशांची गैरसोय होत आहे.
रेल्वे उन्हाळ्यातच काम पूर्ण करू न शकल्यामुळे कामासाठी खोदलेल्या खड्डय़ांत पाणी साचले आहे. या खड्डय़ांत कोणी पडू नये यासाठी रेल्वेने कोणतीही काळजी घेतलेली नाही. खड्डय़ामुळे नागरिकांचा येण्या-जाण्याचा मार्गही खचला आहे. त्यामुळे दुर्घटनेची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे काम लवकर पूर्ण करावे आणि तोपर्यंत खड्डय़ाभोवती संरक्षक कुंपण बांधावे, अशी मागणी होत आहे. ‘हे खड्डे खोदून दीड वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. अद्याप काम पुढे सरकलेले नाही. खोदलेल्या रस्त्यात पाणी साचले आहे आणि त्यांच्या आजुबाजूचा मार्ग खचला आहे,’ असे येथील रहिवासी अशोक आंबेकर यांनी सांगितले.
सध्या पावसाळा सुरू असल्याने फलाटांचे काम बंद आहे. पावसाळा संपला, की पुन्हा काम सुरू करण्यात येईल. काही तांत्रिक कारणांमुळे कामाचा वेग मंदावला आहे.
– ए. के. जैन, मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 6, 2018 3:06 am