उरण नगरपालिकेने १९९६ मध्ये उभारलेल्या राजीव गांधी टाऊन हॉलला अवकळा आली असून पालिकेचे दुर्लक्षच त्यासाठी कारणीभूत आहे. या हॉलचा मद्यपींकडून सर्रास वापर होत असल्याने सभागृहाच्या वरच्या मजल्यावर रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. येथील वाचनालयाचीही दुरवस्था झाली असून छत कोसळण्याच्या मार्गावर आहे.

उरण नगरपालिकेने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने साडेनऊशे आसनक्षमता असलेले हे सभागृह बांधले आहे. या सभागृहाच्या बांधकामानंतरच हॉलचे छत कोसळले होते. त्यानंतर सभागृहाची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र तरीही छताची गळती सुरूच राहिल्याने सिलिंग कोसळू लागले आहे. त्यामुळे येथे कार्यक्रम करण्यास पालिकेने मनाई केली आहे, मात्र अनेक शासकीय कार्यक्रम येथे होत आहेत.

या सभागृहाकडे दुर्लक्ष होत असल्याने मद्यपींनी तेथे चांगलेच बस्तान बसवले आहे. जिन्याच्या पायऱ्यांवर तसेच सभागृहाच्या मागे मद्यपींचा अड्डा जमत असल्याने या भागात बाटल्यांचा खच पडला आहे. येथील मीनाताई ठाकरे वाचनालयाचीही दुरवस्था झाली असून तेथील लाद्या कमकुवत झाल्या आहेत.

या संदर्भात उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्याशी संपर्क साधला असता मद्यपींना आवर घालण्यासाठी पोलिसांचे सहकार्य घेतले जाईल, असे ते म्हणाले.