दोन फूट पाणी; ६० कोटी रुपये खर्च करूनही दुरवस्था

लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : शीव-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्गात वर्षभर पाणी साचत असताना आता यात आणखी एका भुयारी मार्गाची भर पडली आहे. मुंब्रा-पनवेल लोहमार्गाखालील तळोजा येथील भुयारी मार्ग नुकताच खुला करण्यात आला, मात्र बुधवारी खाडीतील भरतीचे पाणी भुयारात साचले. दोन फूट पाणी साचल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली.

तळोजावासीयांसाठी ६० कोटी रुपये खर्च करून हा भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर भुयारी मार्ग खुला करावा अशी रेल्वे व सिडकोची भूमिका होती. मात्र राजकीय श्रेय पदरात पाडण्यासाठी मार्ग खुला करण्यात आला आणि तो पाण्यात गेला. फाटक ओलांडून जाणारा मार्गही प्रशासनाने बंद ठेवल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पनवेल तालुक्यातील खाडी क्षेत्रातील जमिनीवर मातीचा भराव करून वसाहती सिडको मंडळाने वसविल्या आहेत. त्यामुळे या परिसरात भुयारी मार्ग यापूर्वीही यशस्वी झाले नाहीत. शीव-पनवेल महामार्गावरील खारघर, रोडपाली, कामोठे व कळंबोली येथील चार भुयारी मार्ग आणि नावडे येथील एक असे पाच भुयारी मार्गही पाणी साचत असल्याने डासांची पैदास केंद्रे बनली आहेत. त्यामुळे कोटय़वधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचा अनुभव गाठीशी असतानाही सिडको आणि रेल्वे प्रशासनाने हे डास उत्पत्ती केंद्र तळोजा वसाहतीच्या तोंडावर उघडले आहे. हिवाळ्यात दोन फूट पाणी तर पावासाळ्यात भुयारी मार्ग पाण्याखालीच जाणार हे नक्की आहे. यापूर्वी मोटार पंप लावून पाणी खेचण्याचे अनेक प्रयोग अयशस्वी झाले आहेत.

दीड किलोमीटरचा वळसा

प्रथम शिवसेनेने हा मार्ग खुला करण्यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर शेकापमधून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकाला हा मुद्दा हातून जात असल्याचे समजल्यावर त्यांनी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून हा मार्ग खुला केला. परंतु भुयारी मार्ग खुला केल्यानंतर मार्ग पाण्याखाली गेल्याने पाणी काढण्यासाठी कोणता राजकीय पक्ष आंदोलन करेल याकडे तळोजावासीयांचे लक्ष लागले आहे. हा मार्ग बंद झाल्यास नागरिकांना सुमारे दीड किलोमीटरचा वळसा मारून पेणधर फाटय़ावरील रेल्वे फाटक ओलांडावे लागणार आहे.